भद्रावती नगर पालिकेवर सलग चौथ्यांदा जिल्हा प्रमुख बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेने सर्वाधिक १४, भारिप-बमसंने प्रत्येकी ३, बसपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाकपला प्रत्येकी २, तर स्वभाप व अपक्ष एका जागेवर विजय मिळविला आहे. पालकमंत्री संजय देवतळे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडीला धोबीपछाड देत चारी मुंडय़ा चित केले आहे. दरम्यान, या निवडणुकीत सेनेच्या चार माजी नगराध्यक्षांचा पराभव झाला आहे. तर भाजप,मनसे, युवाशक्तीला खाते सुध्दा उघडता आले नाही.
भद्रावती नगरपालिकेच्या एकूण सात प्रभागातील २७ जागांसाठी १८७ उमेदवार रिंगणार होते. शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कांॅग्रेस आघाडीने सर्व २७ उमेदवार उभे केले. यात शिवसेनेचा रथ रोखण्यासाठी कॉंग्रेस नेते व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संजय देवतळे व राष्ट्रवादी कार्याध्यक्ष साळुंखे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १६, तर राष्ट्रवादीने ११ उमेदवार उभे केले होते, तर भाजपचे २४, मनसे २१, बसप २१, भारिप-बमसं १७, स्वभाप २, भाकप २, रिपाइं ६, युवाशक्तीप्रणित अकोला विकास आघाडीने १४, तर अपक्ष २६ उमेदवार रिंगणात होते. यात शिवसेना जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घवघवीत यश संपादन करून पालकमंत्री संजय देवतळे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडविला. घुटकाळा प्रभाग एकमध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले. यात अ सर्वसाधारण महिला गटात शारदा शंकर ठवसे, ब सर्वसाधारण पुरुष गटात सेनेचे अनिल नारायण धानोरकर यांनी कॉंग्रेस आघाडीचे अफजल भाई यांचा १२०० मतांनी दारुण पराभव केला. नागरिकांचा मागास प्रवर्गात महिला राखीव गटातून शोभा विजय सातपुते, सर्वसाधारण गटात विनोद महादेव वानखेडे विजयी झाले. आयुध निर्माण प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती महिला गटात भारिपच्या राखी संतोष रामटेके, सर्वसाधारण महिला गटात भाजपच्या सीमा राकेश पवार, नागरिकांचा मागास प्रवर्गात शिवसेनेचे संदीप भाऊराव वडाळकर व भारिपचे सुनील नीळकंठ खोब्रागडे विजयी झाले.
डोलारा प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात बसपाचे प्रफुल्लकुमार मुनेश्वर गौरकार, सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेच्या नालंदा देवीदास पाझारे, नागरिकांचा मागास प्रवर्गात बसपाच्या सोनिया अनिल कामटकर व सर्वसाधारण गटात भारिपचे विजय माणिकराव मेश्राम विजयी झाले. किल्ला प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेच्या माया कवडू नारळे, सर्वसाधारण गटात शिवसेनेचे नरेंद्र महादेव पडाल, ममता वसंत उमरे, प्रफुल्ल रामदास चटकी हे सेनेचे चारही उमेदवार विजयी झाले. विंजासन प्रभाग क्रमांक पाच अनु. जाती महिला प्रवर्गात शिवसेनेच्या माधुरी गोपाळ कळमकर, सर्वसाधारण महिला गटात कॉंग्रेसच्या अर्चना विनायक आरेकर, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्वभापचे सुधीर उध्दव सातपुते विजयी झाले, तर सर्वसाधारण गटात राष्ट्रवादीचे संजय नामदेव आसेकर यांनी सेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांचा पराभव केला. गजानन प्रभाग क्रमांक सहामध्ये अनु.जाती प्रवर्गात भाकपचे शत्रूघ्न उर्फ राजू महादेव गैनवार, अनु.जमाती प्रवर्गात राष्ट्रवादीचे प्रमोद शत्रूघ्न गेडाम, नामाप्र महिला गटात कॉंग्रेसच्या अल्का गिरीधर सातपुते व शिवसेनेच्या रेखा भाऊराव खुटेमाटे विजयी झाले, तर गौराळा प्रभाग क्रमांक सातमध्ये अनु.जाती महिला प्रवर्गात शिवसेनेच्या आशा सुनील निंबाळकर, सेनेच्या मीनल ज्ञानेश्वर आत्राम व अपक्ष प्रशांत मनोहर कारेकर विजयी झाले.
शिवसेनेने सर्वाधिक १४, बसपा व भारिप-बमसंने प्रत्येकी ३, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाकपला प्रत्येकी २, तर स्वभाप व अपक्ष १ जागेवर विजय मिळविला आहे. पालकमंत्री संजय देवतळे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडीला धोबीपछाड दिली आहे, तर राष्ट्रवादीचे केवळ दोन उमेदवार विजयी झाल्याने कार्याध्यक्ष माजी आमदार साळुंखे गुरुजींना भद्रावतीत तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. प्रदेश कार्यालयातून सातत्याने भ्रमणध्वनी वाजत असल्याने ते तो बंद करून बसले होते. या निवडणुकीत युवा शक्तीने पुन्हा एकदा भाजपला दगा दिला. त्यामुळे या दोन्ही पक्षाला खातेही उघडता आले नाही, तर मनसेचे गेल्या निवडणुकीत उघडलेले खाते बंद झाले आहे. शिवसेनेचे चार माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, चंद्रकला आवारी, ज्ञानेश्वर डुकरे व सरिता सूर यांचा दारुण पराभव झाला.
लोकसभा व विधानसभा निवडणुका समोर असतांना पालकमंत्री संजय देवतळे यांच्या कॉंग्रेस आघाडीला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. स्वत:च्या मतदार संघातील पालिकेत केवळ दोन नगरसेवक निवडून आणणे, यासारखी दुसरी लज्जास्पद बाब कोणती, असा प्रश्न आता विचारला जात आहे, तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळू धानोरकर यांनी सलग वीस वर्षांंपासून पालिकेत भगवा फडकवित ठेवल्याने त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा