येथील भोसला मिलिटरी स्कूलचे माजी कमांडंट व सरचिटणीस मेजर प्र. ब. कुलकर्णी यांच्या ‘बलवंत’ आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन २२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता विनायकदादा पाटील व बिंदुमाधव जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूटच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सैनिकी शिस्त अशी ओळख असलेल्या भोसला मिलिटरी स्कूलने आपली प्रतिमा आजतागायत कायम ठेवली आहे. विद्यालयाची कारकीर्द घडविण्यात अनेक व्यक्तींचे योगदान लाभले. त्यापैकीच एक म्हणजे स्कूलचे माजी कमांडंट व सरचिटणीस मेजर पी. बी. कुलकर्णी. २२ एप्रिल रोजी ते ८५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा धावता आढावा या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्याचे शब्दांकन डॉ. यू. वाय. कुलकर्णी यांनी केले आहे. मेजर कुलकर्णी यांच्या कारकिर्दीत शाळेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. कामकाजात त्यांनी नेहमीच स्वच्छता, जागरूकता, समायोजन, चिकाटी, जिद्द या गुणांवर भर दिला. मुलांच्या निवासी शाळांसाठी शाळेनंतरही तेथे शिक्षक असावे, ही गरज अधोरेखित करीत त्यांनी भवन मास्टर हे स्वतंत्र पद निर्माण केले. यामुळे विद्यार्थ्यांवर वचक निर्माण करून त्यांना शिस्त लावण्याचे काम सोपे झाले. शाळेला विशेष मिलिटरी स्कूलचा दर्जा व विशेष अनुदान मिळण्यासाठी कुलकर्णी यांनी केलेली धडपड उल्लेखनीय आहे. यासाठी शाळेत कमांडंट, मुख्य व साहाय्यक प्रशिक्षण अधिकारी आदी पदे संरक्षण विभागातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली. मैदानांचा चांगला उपयोग करून घेताना विद्यार्थ्यांना स्पेशल कोचिंगसाठी स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून हॉकी, अॅथलेटिक्स व स्वीमिंगसाठी खास प्रशिक्षक बोलाविण्यात आले. क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने रायफल शूटिंगसाठी विशेष कोच, शिष्यवृत्तीसह काही विद्यार्थी व विशेष इंटर्नल शूटिंग रेंज बनवून घेतली. याबरोबर ज्ञानदानातही वेगवेगळे उपक्रम राबविले.
त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा ‘बलवंत’च्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा