पाचगणी येथील टेबल लॅन्डवरील निसर्ग-पर्यावरणाच्या रक्षणासाठी पावसाळ्यात या पठाराच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या मालकीच्या व आशिया खंडातील सर्वात मोठे पठार असलेल्या टेबल लॅन्डचे संवर्धन करणे व त्याचे नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवण्यासाठी कायम स्वरुपी उपाय योजना म्हणून दरवर्षी १३ जून ते १३ सप्टेंबरअखेर पावसाळी मोसमामध्ये टेबललॅन्डवरील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे गुरे चारणे, घोडे- घोडागाडी चालविणे, गुहेचा (केव्हज्) वापर करणे व इतर कोणत्याही टेबल लॅन्डच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा पोहोचविणारे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पावसाळी मोसमामध्ये टेबललॅन्ड वापरास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.
पाचगणीच्या या पठारावर पावसाळय़ात अनेक दुर्मिळ वनस्पती उगवतात. यात रानफुलांच्याही अनेक प्रजाती आहेत. गेल्या काही वर्षांतील इथल्या अर्निबध वापरामुळे पावसाळय़ात दरवर्षी फुलणाऱ्या वनस्पती दिसनाशा झाल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर ही बंदी करण्यात आली आहे. ‘टेबललॅन्ड’च्या संवर्धनाच्या कार्यक्रमास सहकार्य करण्याचे अवाहन पाचगणी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले असून अनधिकृतपणे टेबल लॅन्डचा वापर केल्यास त्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाचे पर्यटन आणि निसर्ग -पर्यावरण प्रेमींकडून स्वागत केले जात आहे.

Story img Loader