पहिले महिला गोविंदा पथक आयोगाच्या बाजूने
बाल गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. दहीहंडी उत्सवात लहान मुलांना जरूर सहभागी करून घ्या, पण थरांपासून त्यांना दूर ठेवा, असा मोलाचा सल्ला कुर्ला प्रबोधनच्या गोरखनाथ दहीहंडी पथकाने दिला आहे.
दहीहंडी उत्सवात थर रचण्यासाठी १२ वर्षांखालील मुलांना सहभागी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा बाल गोविंदा दहीहंडी फोडणारच, अशी भूमिका गोविंदा पथकांच्या पाठबळावर दहीहंडी समन्वय समितीने घेतल्याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. गोरखनाथ दहीहंडी पथकाने मात्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्णयाच्या पारडय़ात मत टाकून आपण या निर्णयाशी सहमत असल्याची भूमिका स्पष्ट केली.
दरवर्षी दहीहंडीची उंची आणि पारितोषिकाची रक्कम वाढतच आहे. या गोष्टीला पायबंद घालणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी सात-आठ थराची दहीहंडी फोडण्याची चुरस गोविंदा पथकांमध्ये लागली होती. या जीवघेण्या चुरशीमुळे १० थर रचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लहान मुलांचा वापर होत आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत घातक आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाने अशा प्रकारचा आदेश देण्यापूर्वीच पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेचा विचार करायला हवा होता, असे गोरखनाथ दहीहंडी पथकाचे प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.
या जीवघेण्या स्पर्धेपासून दूर राहण्यासाठीच आम्ही दरवर्षी दुसऱ्या राज्यात जातो आणि तेथील नागरिकांना महाराष्ट्राच्या दहीहंडी उत्सवाच्या संस्कृतीचे दर्शन घडवितो. तेथील श्रीकृष्णाच्या मंदिराबाहेर पथकातील गोपिका दहीहंडी फोडून हा उत्सव साजरा करतात. केवळ पाच थराचीच दहीहंडी हे पथक फोडते. यंदा आमचे पथक वाराणसी येथे जाऊन दहीहंडी उत्सव साजरा करणार आहे. मात्र १२ वर्षांखालील मुलींना आम्ही थरापासून दूरच ठेवतो, ते त्यांच्या सुरक्षिततेसाठीच, असे भाऊ कोरगावकर म्हणाले.
गेल्या काही वर्षांत लाखो रुपये पारितोषिकांच्या दहीहंडय़ा फोडण्याकडे गोविंदा पथकांचा कल वाढला आहे. त्यामुळे उत्सवाची परंपरा, संस्कृती लयाला जात आहे. केवळ दहीहंडी फोडून उत्सवाची परंपरा टिकविण्याची आस असल्याचे म्हणणारी गोविंदा पथके सकाळीच ठाण्याच्या दिशेने धाव का घेतात, असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की, मोठय़ा रकमांचे आमीष आणि परस्परांमध्ये निर्माण झालेली चुरस एक दिवस या उत्सवाच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत. गोविंदा पथकांनी वेळीच स्वत:ला आवर घालून घेण्याची गरज आहे. दहीहंडी उत्सव हा उत्सवासारखाच साजरा व्हायला हवा, त्याचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश झाल्यास उत्सवाची मजा निघून जाईल.