कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावीच्या लेखी व तोंडी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दि. २ फेब्रुवारीपासून या परीक्षा सुरू होणार आहेत.
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी दिली. प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसदर्भात याआधी वारंवार आंदोलने करण्यात आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आताही यासंदर्भात दि. १० जानेवारीला अर्थमंत्र्यांसमवेत बेठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी राज्याच्या शिक्षण विभागाने या आश्वासनाची पुर्तता केलेली नाही. त्यामुळेच राज्य महासंघाने काल (मंगळवार) झालेल्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्य़ातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकतानाच काळ्या फिती लावून अकरावीच्या वर्गाचे कामकाज करतील अशी माहिती विधाते यांनी दिली.
जानेवारी ९६ पासुन सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, तुकडय़ा टिकवण्यासाठी माध्यमिक विभागाच्या  धर्तीवर विद्यार्थी संख्येचे अट शिथील करावी, कायम विनाअनुदानीत तत्व रद्द करून अशा संस्थाना तात्काळ अनुदान सुरू करावे, सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारप्रमाणे श्रेणी व ग्रेड पे द्यावा, ८-९ सालापासुनच्या १ हजार १६६ वाढीव पदांना मंजुरी द्यावी आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.