इलेक्ट्रॉनिक मीटरविरोधात कोल्हापुरातील पाच हजारांवर रिक्षाचालकांनी सोमवारपासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरू केले. ई-मीटरमुळे होणाऱ्या समस्यांची मांडणी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे रिक्षा व्यावसायिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मंत्र्यांनी ९ मार्च रोजी मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्या वेळी बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, तोपर्यंत आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले. मात्र रिक्षाचालकांनी निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार करीत मंत्र्यांनी केलेले आवाहन अव्हेरले. तर रिक्षाचालकांच्या बेमुदत आंदोलनामुळे प्रवाशांवर पायपीट करण्याची वेळ आली आहे.    
शासनाच्या व प्रादेशिक खात्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांना ई-मीटरची सक्ती करण्यात आली आहे. यास रिक्षाचालकांचा तीव्र विरोध आहे. निकृष्ट दर्जाच्या ई-मीटरमुळे रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये भाडेआकारणीवरून वादाचे प्रसंग घडत आहेत. शिवाय रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे काही हजारो रुपये खर्च करून ई-मीटर बसविणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी शासनाने ई-मीटरचा मोफत पुरवठा करावा व त्याच्या देखभालीचा खर्च तीन वर्षे पाहावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी धरणे आंदोलन केले होते.
सोमवारपासून शहरातील सर्व रिक्षाचालकांनी ई-मीटरविरोधात बेमुदत रिक्षाबंद आंदोलन सुरू केले आहे. कॉमन मॅन, तीनआसनी रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, कोल्हापूर शहर रिक्षा चालक-मालक सेना, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यावसायिक संघटना, शेअर-ए-रिक्षा संघटना, हिंदुस्थान ऑटो रिक्षा संघटना, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक मालक संघ या संघटनांचा समावेश असणाऱ्या रिक्षा व्यावसायिक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन केले जात आहे.
शहरातील सुमारे २०० रिक्षा थांब्यांवर असणाऱ्या पाच हजारांवर रिक्षांचे चालक बेमुदत बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. या बंदमुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात थांबणाऱ्या शेकडो रिक्षांचे दर्शन आज घडले नाही. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांवर रिक्षा बंदमुळे पायपीट करण्याची वेळ आली. अनेक प्रवाशांनी केएमटीचा आधार घेतल्याने तेथे प्रवाशांची गर्दी लक्षणीय प्रमाणात वाढली होती.
रिक्षा बंद ठेवून सर्व थांब्यांवरील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची स्वतंत्ररीत्या भेट घेतली. आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुरेश साळोखे, बाबा इंदुलकर, राजू जाधव, अविनाश दिंडे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ई-मीटर प्रश्नावर मंत्र्यांशी चर्चा झाली. सतेज पाटील यांनी मुंबईतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनाकडून मिळालेली माहिती ऐकून या संदर्भात नंतर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दोन्ही मंत्र्यांनी रिक्षा बंद आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. पण रिक्षाचालकांनी ती नाकारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा