इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात मासेमारी व्यवसाय करून अनधिकृतपणे राहणाऱ्या बारा बांग्लादेशींना इंदापूर पोलीस व जिल्हा विशेष शाखेने सोमवारी कारवाई करुन अटक केली. या बारा जणांमध्ये एका महिला व आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. उजनी जलाशयालगत अनधिकृतपणे बांग्लादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे उघड झाल्यामुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. आकाश बिश्वास (वय २९), टुटूल बिश्वास (वय २६), गौतम विरामन (वय ३३), गवरंग विरामन (वय ३९), जयदीप विश्वास (वय ४७), प्रताप बिश्वास (वय ४१), लालटू बिश्वास (वय २२), श्रीकृष्ण बिश्वास (वय ३६), परेश बिश्वास (वय २९), सुजय पोतदार (वय २४), असिम बिश्वास (वय २४), मिता बिश्वास (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशी नागरिक भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून राहत असल्याची माहिती इंदापूर पोलीस व जिल्हा विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हे नागरिक उजनी जलाशयात मासेमारी करून इंदापूर येथील मासे मार्केट येथे विक्री करत होते. त्यांच्याकडे भारतीय निवडणूक आयोगाचे मोहर असलेले खोटे ओळखपत्र व बनावट कागदपत्र मिळून आली आहेत. त्यांच्याकडे बांग्लादेशाचा पासपोर्ट नसल्याचे व कोणताही व्हिसा नसल्याचे आढळून आले आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व विशेष शाखेचे उपनिरीक्षक नारायण सारंगकर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. ए. देशमुख हे अधिक तपास करत आहेत.