डोंबिवलीत मानपाडा, टिळक चौक या वाहतुकीने नेहमीच गजबजणाऱ्या रस्त्याला पर्याय म्हणून वापरात असणाऱ्या ‘पी अ‍ॅण्ड टी’ कॉलनीतील महत्त्वाच्या रस्त्याच्या मधोमध बेकायदा बंगला तसेच अनधिकृत गाळे उभारण्याचे काम चालू असून हे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशा स्वरूपाच्या नोटिसा स्थानिक ग्रामपंचायतीने बजावल्या आहेत. अनेक वाहन चालक दत्तनगर चौक, नांदिवली रोड, डीएनसी शाळा, स्वामी विवेकानंद शाळा(रामचंद्रनगर) ते पी अ‍ॅन्ड टी कॉलनी येथून भोपर रस्त्याने थेट शिळफाटा रस्त्याकडे जातात. हा रस्ता चाळ माफीयांनी आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. डोंबिवलीतील पी अ‍ॅन्ड टी कॉलनीत शनिमंदिर ते (गंगेश्वरधाम) स्वामी समर्थ मठादरम्यान रस्त्याच्या रखडलेल्या भागात बंगला तसेच काही बेकायदा गाळे उभारण्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम करणाऱ्यांना नांदवली ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. शनी मंदिराजवळील मीलन पार्क ते स्वामी समर्थ चौक असा मोठा रस्ता आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावे वगळल्यानंतर विकास आराखडय़ातील हा रस्ता महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत गेला आहे. मीलन पार्कपासून पुढील चौकापर्यंत हा रस्ता तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या रखडलेल्या रस्त्यामध्ये अनधिकृत गाळे, बंगला, भाजीपाला विक्रीची मंडईचे काम सुरू करून जागा अडविण्यात आली आहे. समर्थनगर चौकात उभ्या राहत असलेल्या अनधिकृत बांधकामाला नांदिवली ग्रामपंचायतीने नोटीस पाठविली आहे. तुकाराम म्हात्रेंसह रस्त्यासाठी जमीन दिलेल्या मूळ मालकांनाही या नोटिसा बजावल्याने कापरं भरलं आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यां, मीलन पार्कमधील रहिवाशांनी मानपाडा पोलीस ठाणे, एमएमआरडीए तसेच मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या होत्या. सरपंच अरुणा पाटील यांनी सांगितले, या रस्त्यामध्ये काही ग्रामस्थ दादागिरी करून, ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधकामे करीत आहेत. महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाचा अंमल सुरू झाल्यापासून या भागात ग्रामपंचायतीने एकाही बांधकामाला परवानगी दिलेली नाही. सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत एमएमआरडीए, जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

Story img Loader