आर्थिक गुन्हेगारी प्रवृत्तीने जमा झालेला काळा पैसा देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी काही शक्ती प्रयत्नशील असतात. या शक्तींमुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने २० ऑक्टोबर २०१२ पासून प्रत्येक बँकेने आपल्या खातेदारांच्या व्यवहाराविषयीचे चार प्रकारातील अहवाल ऑनलाइन पद्धतीने देशाच्या अर्थ विभागाच्या अन्वेषण विभागाकडे पाठविणे बंधनकारक केले आहे. तरी काळय़ा पैशावर नियंत्रणासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अर्थखात्याच्या आर्थिक अन्वेषण विभागाचे उपसंचालक आनंद गोखले यांनी केले.
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड अर्बन बँकेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित ‘को-ऑपरेटिव्ह बँक्स वर्कशॉप ऑन एफआयएन गेट’ या विषयावरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.ए. दिलीप गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आनंद गोखले म्हणाले, की बँकिंग यंत्रणेद्वारे काळा पैसा देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात आणणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच आर्थिक दहशतवाद काबूत ठेवण्यासाठी भारत सरकारचे अर्थ मंत्रालय प्रयत्नशील आहे. त्यात बँकांची भूमिका महत्त्वाची असून, प्रत्येक बँकांनी आपल्या खातेदारांच्या व्यवहाराचा तपशील चार अहवालाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अर्थखात्याला कळवून देशहिताचे काम करावे. पूर्वी ही माहिती मॅन्युअल पद्धतीने अन्वेषण विभागाला सादर केली जात होती. मात्र, त्यामध्ये अनेक त्रुटी राहत होत्या. तसेच, या अहवालातील माहितीची गुप्तता राहत नव्हती. त्यामुळे खातेदारांच्या व बँकांची माहिती सहज रीत्या बाहेर मिळू शकत होती. आता ही माहिती चार अहवालाद्वारे अर्थ विभागाला ऑनलाइन सादर करावयाची आहे. ही सादर केलेली माहिती अन्वेषण विभागात जमा झाल्यानंतर त्यांचे विस्तृत पद्धतीने विश्लेषण होणार आहे. त्यामुळे काळा पैसा अथवा चुकीच्या पद्धतीने मिळविलेला पैसा मुख्य आर्थिक प्रवाहात आणणाऱ्यांवर प्रतिबंध बसेल. तसेच आर्थिक दहशतवाद नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे काम एका अर्थाने देशहिताचे असून, त्यात सर्व बँकांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे.
दिलीप गुरव म्हणाले, की अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांच्या नेतृत्वाखाली कराड अर्बनची दमदार वाटचाल सुरू आहे. कराड अर्बन बँक ही सामाजिक बांधिलकी जपणारी बँक आहे. बँक २०१७ साली शताब्दी महोत्सवात पदार्पण करत आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आजच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून बँकेच्या प्रतिनिधींना योग्य मार्गदर्शन होईल व त्यांच्या शंकांचे निश्चितच निरसन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
परिषदेला पश्चिम महाराष्ट्रातील ८१ बँकांचे १७२ प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेच्या ऑडिट विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी केले. आभार दिलीप देशपांडे यांनी मानले. या वेळी बँकेचे अधिकारी व्ही. के. जोशी, माधव माने, नेताजी जमाले, अर्चना चिंचणकर, बी. के. जाधव, डी. आर, बांदल, अमित रेठरेकर, बसवेश्वर चेणगे उपस्थित होते.