गेल्या हंगामात दुष्काळी स्थितीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने देऊ केलेले अनुदान बँकेत जमा असूनही तक्रारींमुळे मिरज तालुक्यात रोखण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांना पुढील आदेश मिळेपर्यंत अनुदान वाटप थांबविण्यात यावे अशा सुचना महसूल विभागानी बँकांना दिल्या आहेत.
मिरज तालुक्यातील भोसे, मालगाव, एरंडोली, सोनी यासह काही गावातील शेतक-यांनी अनुदान वाटपाबाबत तहसीलदारांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी हे अनुदान रोखण्याचे आदेश महसूल विभागाने बँकांना दिले होते. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी पसे काढण्यासाठी बँकेत गेले असता हा प्रकार लक्षात आला. बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये आणि जिरायत पिकासाठी प्रति हेक्टरी ३ हजार रुपये असे सानुग्रह अनुदान शासनाने शेतक-यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग केले आहे. हे अनुदान तलाठय़ांकडे नोंद असणा-या सातबा-यावरील शेतक-यांच्या यादीनुसार वर्ग करण्यात आले आहे.
गावपातळीवरील विकास सोसायटीकडे अनुदान प्राप्त शेतक-यांच्या याद्या देण्यात आल्या आहेत. काही शेतक-यांची बँक खाती नसल्याने अनुदान वाटपात अडथळे येत आहेत. या शिवाय चार-पाच गावांसाठी एकच बँकेची शाखा असल्याने सर्वच खातेदारांची अनुदान मिळविण्यासाठी बँकेत झुंबड उडाली आहे. बँकेत अपुरे कर्मचारी असल्यामुळे नवीन खाते काढणे आणि दैनंदिन व्यवहार सांभाळणे कर्मचा-यांनाही कठीण बनले आहे. यामुळे काही शेतक-यांनी अनुदानाबाबत तहसीलदारांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
याबाबत मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता अनुदान रोखण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. शेतक-यांच्या तक्रारींची दोन दिवस शहानिशा करण्यात आली असून तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनुदान वाटपाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. उद्यापासून शेतक-यांना संबंधित बँकांमध्ये अनुदान प्राप्त होईल असेही  तहसीलदार घाडगे यांनी सांगितले.