ग्राहकांचा पैसा बिनबोभाटपणे वापरून त्यांची लूट केली जात असल्याचे बँकांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. मोटार अपघातांचे दावे निकाली काढून विम्याचा पैसा धनादेशाच्या माध्यमातून ग्राहकांना अदा करण्याची पद्धत कित्येक वर्ष अस्तित्वात होती. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या सुविधेसाठी थेट त्यांच्या खात्यावरच रक्कम गोळा व्हावी या हेतूने नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने(एनआयसीएल) बँकेत खाते उघडले. मात्र, ग्राहकांच्या पैशांचा दुरुपयोग बँकांमार्फत होत असल्याचे लक्षात आले. कारण १५ ते २० दिवस ग्राहकांना त्यांच्या विम्याचे पैसे मिळत नसल्याने ग्राहकांना वैतागून नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि बँकांकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत.
मोटार अपघातांचे दावे निकाली काढून ग्राहकांना सेवा देणारी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडे या कंपनीच्या ग्राहकांनी बँकांविरुद्ध तक्रार केल्याने या कंपनीनेही स्वत:चे बँकेचे खाते बदलवण्याचा निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. एनआयसीएलचे बँक ऑफ इंडियामध्ये खाते असताना त्यांनी बँकच बदलण्याचा निर्णय घेऊन अ‍ॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदाशी संपर्क साधला. कंपनीचे या दोन्ही बँकांशी खाते उघडण्याच्या संदर्भात बोलणी सुरू असल्याच्या वृत्ताला व्यवस्थापक (दावा केंद्र – प्रभारी) बाबूलाल सोनकर यांनी दुजोरा दिला आहे.  एनआयसीएल ही मोटारच्या विम्याचे दावे निकाली काढणारी केंद्र शासनाची कंपनी आहे. रोजचे ३० ते ४० दावे निकाली काढणारी ही कंपनीचा महिन्याला ग्राहकांचे जवळपास ३० लाख रुपये अदा करते म्हणजे वर्षांला कंपनीची कोटय़वधींची उलाढाल बँकेमार्फत होत असते. मात्र, बँका १५ ते २० दिवस ग्राहकांना झुलवतात आणि बिनव्याजी पैसा वापरतात. यासंदर्भात सिटिझन्स फोरमचे सरचिटणीस सुधाकर तिडके यांनी बराच पाठपुरावा केला. नॅशनल इन्शुरन्स कंपनीशी आणि काही बँकांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून बँका बेकायदेशीररित्या ग्राहकांचा पैसा त्यांच्या परवानगीशिवाय वापरतात, असा आरोप त्यांनी केला आहे. विमा कंपन्या ग्राहकांच्या हितासाठी, ग्राहकांना लवकर पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न करीत असताना बँकांनी अशाप्रकारे ग्राहकांचा पैसा वापरणे गैर आहे. त्यामुळे शासनाच्या कंपनीपासून ग्राहक दुरावतो आणि खाजगी विमा कंपन्यांच्या जाळ्यात येतो, असेही तिडके म्हणाले.