शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अवाढव्य वटवृक्ष कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक वाहनधारक जागीच ठार झाला. यावेळी अनेक वाहनांचे नुकसान झाले. झाडाखाली रस्त्यावरून मार्गस्थ होणारे अनेक वाहनधारक व पादचारी सापडण्याची भीती होती. परंतु, यावेळी झालेल्या मोठय़ा आवाजाने सावध झालेल्या काहींनी तातडीने सुरक्षितस्थळी धाव घेतल्याने ते थोडक्यात बचावले. पडलेल्या वृक्षामुळे या मार्गावरील वाहतूक कित्येक तास पूर्णपणे बंद करावी लागली. वाळवी लागल्यामुळे हे झाड अचानक कोसळल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला असला तरी अगदी रस्त्यात असणारा हा हिरवागार वृक्ष स्थानिकांना अडचणीचा ठरत असल्याने जाणूनबुजून ही कृती केली गेली की काय, अशी साशंकता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरून कालिदास कलामंदिरमार्गे शालिमारकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. कलामंदिराच्या प्रवेशद्वारासमोर कित्येक दशकांपासून हा डेरेदार वृक्ष दिमाखात उभा होता. या वृक्षालगत खासगी रुग्णालय असून कलामंदिर व व रुग्णालयात येणारे बहुतेक जण या झाडाखालीच वाहने उभी करत असत. तसेच झाडाच्या सावलीखाली बहुतेक जण उभे राहात असत. सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. अनेकांना प्रारंभी काही समजलेच नाही. डेरेदार वृक्ष पाहता पाहता जमिनीवर कोसळला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरून मार्गस्थ होणारा वाहनधारक सोमनाथ बेंडकुळे झाडाखाली सापडला. रिक्षा, जीप, काही दुचाकी अशी अन्य वाहनेही त्याखाली सापडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कोसळलेल्या वृक्षाने संपूर्ण रस्ता व्यापून टाकला. या घटनेची माहिती समजल्यावर अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. प्रथम दुचाकी वाहनधारक ज्या ठिकाणी अडकला होता, त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. लाकूड कापणाऱ्या यंत्राच्या मदतीने फांद्या छाटून बेंडकुळे यांना बाहेर काढण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बेंडकुळे हे महापालिकेचे कर्मचारी होते. जकात विभागातून त्यांची नुकतीच मूळ उद्यान विभागात बदली झाली होती. शिवाजी उद्यानात ते कामावर रुजू होण्यास जात असताना ही दुर्घटना घडल्याचे सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वृक्षाखाली रिक्षाचालक व प्रवासी अडकण्याची शक्यता होती. परंतु चालकाने आवाज ऐकून प्रवाशांना बाहेर पडण्याचा इशारा दिला. हे सर्वजण क्षणाचाही विलंब न करता रिक्षाबाहेर पडले आणि दूर पळाले. यामुळे आम्ही सर्व वाचू शकलो, असे रिक्षाचालक सुभाष पाटील यांनी सांगितले. हा वृक्ष आकाराने इतका विशाल होता की, त्यामुळे अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडून शालिमारकडे येणारी-जाणारी सर्व वाहतूक बंद झाली. याच परिसरात महापौर अॅड. यतिन वाघ यांचे निवासस्थान आहे. यामुळे अग्निशमन विभागाने युद्धपातळीवर रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले. चार ते पाच लाकूड कापणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने दीड ते दोन तासात बहुतांश फांद्या वेगळ्या करून बाजूला करण्यात आल्या. झाडाचा बुंधा अतिशय वजनदार असल्याने त्यासाठी खास यंत्रणा मागविण्यात आली. हिरवागार दिसणारा हा वृक्ष कोसळण्यामागे त्याच्या बुंध्याला व अंतर्गत भागास लागलेली वाळवी कारणीभूत असल्याचा अंदाज अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी व्ही. के. गवळी यांनी व्यक्त केला. परंतु, काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा वृक्ष आसपासच्या काही जणांना अडचणीचा ठरत होता. यामुळे तो पाडण्यासाठी काही औषध फवारणी वा तत्सम प्रयोग गेल्याची साशंकताही व्यक्त केली जात आहे.
दैव बलवत्तर म्हणून..
वटवृक्ष कोसळण्याच्या केवळ काही मिनिटे आधी एक बोलेरो जीप झाडाखाली येऊन उभी राहिली. जीपमधील तीन-चार जण रूग्णास घेऊन शेजारच्या रूग्णालयात जात नाही तोच ही घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून बोलेरोतील सर्व जण बचावले.
बेंडकुळेंच्या पत्नीस पालिकेत नोकरी
वटवृक्षाखाली सापडून ठार झालेले महापालिका कर्मचारी सोमनाथ बेंडकुळे यांच्या पत्नीस महापालिका सेवेत सामावून घेण्यात येईल, अशी माहिती महापौर अॅड. यतिन वाघ यांनी दिली.
महाकाय वटवृक्षाने एक बळी घेतला
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास अवाढव्य वटवृक्ष कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक वाहनधारक जागीच ठार झाला. यावेळी अनेक वाहनांचे नुकसान झाले. झाडाखाली रस्त्यावरून मार्गस्थ होणारे अनेक वाहनधारक व पादचारी सापडण्याची भीती होती.
First published on: 28-05-2013 at 04:28 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banyan tree took a life