कडेकोट बंदोबस्त, गेल्यावर्षी झालेल्या पोलिसी कारवाईची भीती आणि दिल्लीमधील ‘ती’चा मृत्यू यामुळे बहुसंख्य तरुणाईने सोमवारी रात्री घरीच राहणे पसंत केल्याने ‘ड्रंकन ड्राईव्ह’मध्ये यंदा केवळ २९५ तळीराम अडकले. काल रोजच्या तुलनेत चाळीस टक्केही व्यवसाय झाला नसल्याचे काही ‘बार’ मालकांनी सांगितले.
मावळत्या वर्षांला निरोप तसेच नव्या वर्षांच्या स्वागताप्रसंगी तरुणाई बेधुंद होत रस्त्यावर उतरते. आनंदातिरेकाने मद्यधुंद तरुणाई बेफाम वाहने हाकत तथाकथित जल्लोष करते. त्याचा त्रास इतर नागरिकांना होतो. अपघात होतात. त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसी यंत्रणेला रात्र जागवावी लागते. गेले तीन-चार दिवस अधिकाऱ्यांच्या बैठकीत बंदेबस्ताबाबत बराच खल झाला. अखेर बंदोबस्ताची रूपरेषा ठरली. काल सोमवारी सायंकाळपासून वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, गांधीनगर, अंबाझरी, फुटाळा, सीताबर्डी, महाल, सदर, वर्धमाननगरसह शहराच्या विविध ठिकाणी एकूण सहा हजारावर पोलीस तैनात करण्यात आले. याशिवाय पोलिसांची पथके पहाटेपर्यंत गस्त घालत होती. शहरातील विविध रस्त्यावर लोखंडी कठडे लावण्यात आले. तेथेही पोलीस तैनात होते. शहरातील सर्व उड्डाण पूल रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.
महिला वा तरुणींची छेडखानी करणाऱ्या गुंडाना चोप देण्यासाठी खास पथके शहरात फिरत होती. अंबाझरी, फुटाळा तलाव तसेच शहरातील विविध उद्यानांमध्ये पोलीस तैनात होते. हॉटेल्समध्येही साध्या वेषातील पोलीस तैनात होते. शंकरनगर चौक ते जीएस कॉलेज दरम्यान सायंकाळपासूनच पोलीस गस्त घालत होते. मात्र, रस्त्यावरील दृष्य काल काही वेगळेच होते. रस्त्यावर फारतर काही मोजकी वाहने जात होती. बारमध्ये एरवी असते तेवढीही गर्दी नव्हती. अगदीच शौकिन तेवढे रस्त्यावर होते. एवढा अपवाद वगळला तर रस्त्यावर पोलीसच जास्त दिसत होते. शहर पोलिसांजवळ बोटांवर मोजण्याइतके ब्रिथ अ‍ॅनलायझर आहेत. कालच्या साठी महामार्ग पोलिसांकडून जास्तीचे ब्रिथ अ‍ॅनलायझर मागावून घेण्यात आले होते. रस्त्यांवरकठडे लावून वाहतूक पोलीस तपासणीसाठी अक्षरश: वाट पाहत होते. काल सायंकाळपासून मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत ‘ड्रंकन ड्राईव्ह’मध्ये केवळ २९५ तळीराम अडकले. याशिवाय वाहतूक पोलिसांनी १८७ वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म काढून टाकल्या.
काल रोजच्या तुलनेत चाळीस टक्केही व्यवसाय झाला नसल्याचे काही ‘बार’ मालकांनी सांगितले. तरुणाईला यंदा काय झाले, असाच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता.
अनेकांनी बाहेर फिरण्यापेक्षा घरातच राहणे पसंत केले, असे काहींचे म्हणणे होते. दिल्लीमधील ‘ती’चा मृत्यू झाल्याने तरुणाईने घरीच राहण्याचा निर्णय घेतला, असाही मतप्रवाह ऐकू आला.