भारतातील बॉलिवूडसह टॉलिवूड, कॉलिवूड अशा कोणत्याही ‘वूड’मधल्या कोणत्याही कलाकाराला विचारा. तेवढेही कशाला हॉलिवूडमधलाही कोणताही कलाकार घ्या. त्याने जर सांगितले, ‘अमेरिकेचा अध्यक्ष माझ्याबरोबर सिनेमात काम करतो आहे.’ तर? तुम्ही दयेने त्याच्याकडे पाहाल, बिचाऱ्याला नैराश्य आले असावे, असे म्हणून सहानुभूती व्यक्त करून निघून जाल. पण थांबा. असा स्वत:च्या मनावर परिणाम करून घेऊ नका. हॉलिवूड, बॉलिवूड नव्हे तर चक्क आपल्या मराठमोळ्या सिनेसृष्टीतील राजेश शृंगारपुरे याने असे काही विधान केले तर त्याला ‘वेडय़ा’त काढू नका. गांभीर्याने मनावर घ्या. कारण अमेरिकेचे दस्तुरखुद्द अध्यक्ष प्रेसिडेंट बराक ओबामा त्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून एका हॉलिवूडपटात काम करताहेत!
‘अल कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्याविरुद्ध केलेल्या कारवाईवर आधारलेला हा चित्रपट असून त्यात राजेश एका सीआयए एजंटची भूमिका करतो आहे. ‘सील टीम सिक्स – द रेड ऑन ओसामा बिन लादेन’ असे या चित्रपटाचे नाव असून जॉन स्टॉकवेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.दिग्दर्शक हार्वे कायटेल यांच्या ‘गांधी ऑफ द मंथ’ या चित्रपटात राजेश काम करत होता. कायटेल यांना त्या चित्रपटातील राजेशचे काम आवडल्याने त्यांनी स्टॉकवेल यांना त्याचे नाव सुचवले. त्यानंतर स्टॉकवेल यांनी राजेशची याआधीची कामे बघितली. त्याची स्क्रीन टेस्टही घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी या चित्रपटातील सीआयए एजंटच्या भूमिकेसाठी राजेशची निवड केली, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या चित्रपटांत राष्ट्राध्यक्षाची भूमिका एखादा अभिनेता करतो, असा आतापर्यंतचा शिरस्ता आहे. मात्र ‘सील टीम सिक्स’मध्ये राष्ट्राध्यक्षांची भूमिका दस्तुरखुद्द बराक ओबामा यांनीच केली आहे.
हा चित्रपट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधीच अमेरिकेतील दूरचित्रवाणीवर प्रदर्शित करण्यात आला. ओबामा यांना या चित्रपटाचा फायदा मिळाल्याचा अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी बांधला आहे. त्याचा हॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘गांधी ऑफ द मंथ’ हा चित्रपट ‘सील टीम सिक्स’ नंतर प्रदर्शित झाला. राजेश सध्या प्रचंड व्यग्र असून तो तीन चित्रपटांत काम करत आहे. यात ‘शॉर्टकट रोमियो’, आणि ‘मर्डर ३’ अशा बडय़ा चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर देव पटेल याच्यासह तो एका चित्रपटात खलनायकाची भूमिकाही करत आहे.    

Story img Loader