तो कधी उपजिल्हाधिकारी म्हणून भेटायचा, तर कधी राजकीय नेत्यांचा स्वीय साहायक.. काही वेळा तर मंत्री असल्याचे रूपही त्याने छान वठवले. सरकारी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना गाठायचा.. काम करून देण्याची खात्री पटवायचा आणि पैसे घ्यायचा.. अनेकांना गंडवत त्याने तब्बल एक कोटी रुपये उकळले. अखेर पोलिसांना तो सापडला आणि तो प्रत्यक्षात एक साधा ‘हमाल’ असल्याचे उघड झाले. एके काळी पोटापाण्यासाठी मिमिक्री करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी पार्टीचे नेते शरद पवार यांचे आवाज काढणाऱ्या या ठकाने या कलेचा लीलया वापर करत अनेकांना टोप्या घातल्या. पुणे विद्यापीठात स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणाऱ्या नगरमधील एकाने आपल्या एका मित्राकडे सरकारी नोकरीविषयी चौकशी केली होती. राहुल गाडे नावाचा एकजण मंत्रालयात महसूल विभागात उपजिल्हाधिकारी असून तो हे काम नक्की करेल असा सल्ला त्या मित्राने दिला. त्यानुसार तक्रारदाराने गाडे याच्याशी संपर्क साधला. अहमदनगर जिल्ह्य़ामध्ये तलाठय़ाची जागा रिक्त आहे. चार लाख रुपये देण्याची तयारी असेल तर नोकरी देतो, असे आमिष गाडेने दाखवले. इतकेच नव्हे तर चार लाख रुपये घेऊन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर येण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच गाडे पिवळा दिवा असलेल्या गाडीतून खाली उतरला आणि तक्रारदारासमोर आला. त्यांनी सोबत आणलेले साडेतीन लाख रुपये ताब्यात घेऊन गाडे तेथून निघून गेला. मात्र त्यानंतर त्याचा मोबाइल फोन बंद असल्याचे आढळून आल्याने संशय बळावला आणि तक्रारदाराने महसूल विभागात तसेच मंत्रालयात गाडेची चौकशी केली. परंतु अशा नावाचा कोणीही अधिकारी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आपण पुरते फसविले गेल्याचे लक्षात येताच गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे, दिनकर भोसले, दिलीप फुलपगारे, नितीन पाटील आदींच्या पथकाने मोबाइल फोनच्या ठावठिकाण्यावरून गाडेचा शोध घेतला. चेंबूर येथील पोस्टल कॉलनीत तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. गाडे याने आतापर्यंत सात-आठ जणांकडून सुमारे एक कोटी उकळले आहेत. त्यापैकी ७५ लाख रुपये मुंबईतील बारमध्ये उडविल्याचे निष्पन्न झाले आहे. चेंबूरमध्ये तो सध्या भाडय़ाने राहत होता. बारामतीतील एसटी स्टँडवर हमालाचे काम करणारा गाडे नंतर मिमिक्री करून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे आवाज काढत असे. बारामतीतील यादववाडी गावात त्यावरून दोन गटात दंगलही झाली होती. अतिरिक्त आयुक्त के. एम. प्रसन्ना, उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा