मराठीतील आपला ‘काकस्पर्श’ व हिंदीतील ‘बर्फी’ असे दोन चित्रपट ऑस्करच्या मानांकनासाठी पाठवले जाणार होते, परंतु काकस्पर्श हा जीवंत अनुभवाचा होता व बर्फी हा पाश्चात्य चित्रपटावर बेतलेला असूनही हिंदी चित्रपटसृष्टीच्या दादागीरीमुळे काकस्पर्श मागे पडला, असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज व्यक्त केले.
माजी आमदार राजीव राजळे यांच्या आदि फौंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावेडीच्या जॉगिंग पार्क मैदानात आयोजित केलेल्या ‘शरद पवार बुक फेस्ट-२०१२’मध्ये आज सायंकाळी संवादाचे पुष्प गुंफताना मांजरेकर बोलत होते. प्रा. मकरंद खेर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
मराठी चित्रपटसृष्टीत मोठी ताकद आहे, आपणही मराठी चित्रपट निर्माण करताना समस्या केंद्रित करुनच तयार केले, त्यामागे आपली भावना आहे. एचआयव्हीग्रस्तांसाठी ‘निदान’, शिक्षण समस्येविषयी ‘शिक्षणाच्या आयचो घो’, मराठी मध्यमवर्गीयांच्या समस्येबद्दल ‘मी शिवाजीराव भोसले बोलतोय..’ ही चित्रपटनिमिर्ती त्यातूनच झाली, असे मांजरेकर म्हणाले. यावेळी त्यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीविषयी व समाजपद्धतीविषयी जोरदार टिका केली. आपले सुरुवातीचे आयुष्य गरिबीत गेले, तरी आपण पैशाला महत्व देतच आहोत, असे सांगताना, देव मानावा, पण किती मानावा व ढोंगीपणा किती करावा, यावर विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही मत व्यक्त केले. बुक फेस्ट ही आजची मोठी गरज आहे, आजच्या पिढीला मल्टिमिडिया महत्वाचा झाल्याने वाचनाकडे समाज वळण्यास तयार नाही, त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाचनाचे महत्व पटवून द्यावे, त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील वडाळा येथे आपण सर्वसामान्य कुटुंबात वाढलो, सुरुवातीला क्रिकेटमध्ये रस होता, नंतर अपघाताने चित्रपट क्षेत्राकडे वळलो, आयुष्य जे घडले त्यात घरातील महिलांचा मोठा वाटा आहे, काही दिवस बोअरवेलच्या गाडीवर कामगार म्हणून काम केले, चित्रपट क्षेत्रात सुरुवातीला मोठय़ा प्रमाणावर अपयशही आले, १९९३ मध्ये केलेले पहिले नाटक ‘ध्यानी मनी’चे पहिले सहा प्रयोग अयशस्वी झाले, परंतु जिद्द हरलो नाही, पुन्हा कामाला लागलो व नंतरचे १०० प्रयोग हाऊसफुल्ल झाले, नंतर दामिनीसारखी मालिका केली, ती प्रेक्षकांना पसंत पडली. चित्रपट व मालिका या दोन्ही रसिकांसाठी असाव्यात, असे मांजरेकर म्हणाले.
यावेळी त्यांच्या हस्ते ‘अहमदनगर सिनेमा फॅन्स क्लब’चे उद्घाटन झाले. चित्रकार प्रमोद कांबळे यांनी त्यांचे पेन्सिल चित्र साकारले. राजीव राजळे यांनी स्वागत केले. किशोर मरकड यांनी आभार मानले.
‘काकस्पर्श’ डावलून ‘बर्फी’ ऑस्करला..
मराठीतील आपला ‘काकस्पर्श’ व हिंदीतील ‘बर्फी’ असे दोन चित्रपट ऑस्करच्या मानांकनासाठी पाठवले जाणार होते, परंतु काकस्पर्श हा जीवंत अनुभवाचा होता व बर्फी हा पाश्चात्य चित्रपटावर बेतलेला असूनही हिंदी चित्रपटसृष्टीच्या दादागीरीमुळे काकस्पर्श मागे पडला, असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-12-2012 at 04:00 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barfi in oscar disregard kaksparsh