आदिवासी बारीपाडा हे गाव राज्यात विकासासाठी पथदर्शी म्हणून स्वीकारण्यात येईल. या गावातील सभागृहाच्या बांधकामासाठी आदिवासी विकास विभागाच्या ठक्करबाप्पा योजनेतून २५ लाख रुपये मंजूर करण्यात येत आहेत, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी दिली.
साक्री तालुक्यातील अतिदुर्गम बारीपाडा या गावातील वनसंवर्धन, जलसंधारण, शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, शैक्षणिक विकास, बचत गट, आरोग्य, ऊर्जा, वनभाजी, पाककला, स्ट्रॉबेरी लागवड आदी कामांची पाहणी पिचड यांनी केली. या कामाचे सर्व श्रेय चैत्राम पवार यांना देऊन त्यांची स्तुती केली. या वेळी व्यासपीठावर आ. योगेश भोये, जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, आदिवासी अपर आयुक्त एस. वाय. कापसे, आदिवासी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत खाडे, माजी खासदार बापू चौरे आदी उपस्थित होते.
१९९२ पूर्वी उजाड, ओसाड, माळरान, पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, दूपर्यंत हिरवाई नाही, अशी बारीपाडय़ाची स्थिती होती. चैत्राम पवार यांनी ग्रामस्थांच्या सहायाने वनसंवर्धन समिती करून गावात चराई बंदी, कुऱ्हाड बंदी, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, पर्यावरण संतुलन, व्यसनमुक्ती असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून गावचा विकास साध्य केला. उच्च संस्कृती ही आदिवासी संस्कृती आहे. आदिवासी हा देशाचा मूळ रहिवासी आहे. बारीपाडा येथे सुंदर जंगल निर्माण केले असून या जंगलातील आदिवासी पाडय़ांमधील झोपडय़ात वन पर्यटन झाले पाहिजे. शासन वन पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पिचड यांनी व्यक्त केले.
जगातील ७८ देशांमध्ये चांगले गाव कसे असावे यासाठी तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली. त्यात चीन या देशातील गावाचा पहिला, तर भारतातील बारीपाडा या आदिवासी गावाचा दुसरा क्रमांक आला. ही आपल्या देशासाठी आणि चैत्राम पवार यांच्यासाठी भूषणावह बाब असून आतापर्यंत पवार यांना १३ पुरस्कार विदेशात मिळाले आहेत. बारीपाडय़ाच्या विकास कामाची पाहणी व त्यावर अभ्यास करण्यासाठी बारीपाडय़ात कॅनडाचा विद्यार्थी तीन महिने राहिला. त्याने या गावच्या विकासाबाबत प्रबंध सादर केला व बारीपाडय़ाचे नाव जगात पोहचविले, परंतु चैत्राम पवार यांची हवी तशी दखल घेतली गेलेली नाही. चैत्राम पवार यांना आदिवासी सेवक पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आदिवासी हा मातृसत्ताक समाज असल्याने महिलांचा सन्मान केला जातो. बारीपाडय़ात बचत गटांचे काम चांगले आहे. गावात आता स्ट्रॉबेरीसारख्या उच्च प्रतीच्या तांदळाचे उत्पादन घेतले जात आहे. बारीपाडय़ासाठी जे जे शक्य ते सर्व काही आपण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी बारीपाडा हे वन औषधीचे भांडार असून आदिवासी विकास विभागाने या गावात वन औषधीची नर्सरी निर्माण करून या गावास विकासासाठी पथदर्शी म्हणून स्वीकारावे, अशी सूचना केली. प्रास्ताविकात चैत्राम पवार यांनी गावात आतापर्यंत श्रमदानाने ४७० छोटे बांध बांधून त्यात पाणी अडविण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे शेती उत्पादनात वाढही झाली. गावात बचत गट, भाजी स्पर्धा आदी नावीन्यपूर्ण उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा