गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील आमगाव उपविभागांतर्गत देवरी राष्ट्रीय मार्गावर असलेल्या स्मशानघाटानजीक बंधारा बांधकाम सुरू आहे. या बंधाऱ्याचा बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, शाखा अभियंत्याने बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचे कबूल करून वारंवार सूचना देऊनही संबंधित कंत्राटदाराला ऐकत नसल्याचे स्पष्ट केले. या बांधकामाचे देयक थांबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवरी येथील राष्ट्रीय महामार्गाला लागूनच स्मशानघाटजवळून नाला वाहतो. या नाल्यावर स्मशानघाट असल्याने पाणवठा तयार करण्यात आला. यामुळे येथे पाणी अडविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिमेंट  बंधारा  बांधकाम गेल्या वर्षांपासून सुरू आहे.
या बांधकामाचे कंत्राट एका जिल्हा परिषद सदस्याच्या पती महोदयांना देण्यात आले आहे. बांधकामाच्या सुरुवातीपासूनच बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याची ओरड सुरू आहे. गेल्या वर्षी बांधकाम पूर्ण झाले नव्हते. यामुळे यावर्षी त्याच बंधाऱ्याचे काम पुन्हा करण्यात येत आहे. या बांधकामावर अत्यंत निकृष्ट माती मिश्रित आणि अयोग्य गिट्टीचा सर्रास वापर सुरू आहे. एवढेच नाही, तर रेतीसुद्धा बांधकाम स्थळावरील वापरली जात असून, बांधकामास योग्य नसल्याचे दिसून येते. या बांधकामात वापरले जाणारे सिमेंट मुदतबाह्य असल्याचे दिसून आले. दगड झालेले सिमेंट बारीक करून वापरले जात आहे. शिवाय, काँक्रिटमध्ये वापरली जाणारी गिट्टीही प्रमाणापेक्षा मोठी असल्याने या बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत सुमार स्वरूपाचे आहे.
याविषयीच्या प्राप्त तक्रारींविषयी या बांधकामाशी संबंधित असलेले शाखा अभियंता कटरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे बांधकाम निकृष्ट होत असल्यास दुजोरा दिला. संबंधित कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊनही काही सुधारणा होत नसल्याचे सांगून या बांधकामाचे देयकसुद्धा   थांबविणार  असल्याचे त्यांनी सांगितले. हे बांधकाम हे स्मशानघाटानजीक असल्याने ते नागरिकांच्या सोयीचे आहे. यामुळे येथे पाणी साठविण्याच्या दृष्टीने पक्का बंधारा बांधला जावा, अशी देवरीकरांची मागणी आहे. परंतु, लोकप्रतिनिधीने अत्यंत निकृष्ट बंधारा बांधकामाकडे दुर्लक्ष करणे अपेक्षित नसल्याने या कंत्राटदाराच्या इतरही बांधकामाविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

Story img Loader