‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर जेएनपीटी बंदरात दोन हजार मीटर लांबीची जेटी असलेले चौथे बंदर उभारण्यासाठी जागतिक निविदा काढण्यात आलेली होती. यात सिंगापूर पोर्टने सर्वाधिक ३५.८० टक्के महसूल देण्याचे मान्य केल्याने सिंगापूर पोर्टला चौथ्या बंदराचे काम देण्यात आलेले आहे. दुसऱ्यांदा काढण्यात आलेल्या या निविदेवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करून चौथ्या बंदराच्या उभारणीत अडथळा निर्माण केला जात असल्याची खात्रीलायक माहिती बंदर विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. मात्र निविदेसंदर्भात आक्षेप फेटाळण्यात आल्याने बंदराचे काम लवकरच सुरू होईल.
जेएनपीटी बंदरात जेएनपीटी बंदराची लांबी-६८० मीटर, दुबई पोर्ट वर्ल्ड-६०० मीटर, जी.टी.आय.-७१२, तर नव्याने तयार होत असलेले ३३० मीटरची दुबई पोर्टचीच जेटी अशी तीन बंदरे आहेत. या तीनही बंदरांपेक्षा चौथ्या बंदराच्या जेटीची लांबी अधिक असून ती दोन हजार मीटरची आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदराच्या कंटेनर हाताळणीत दुपटीने वाढ होणार आहे. २०११ साली काढण्यात आलेल्या जागतिक निविदेनुसार सिंगापूर पोर्टल बंदराच्या उभारणीचे काम मंजूर करण्यात आलेले होते. मात्र काही कारणास्तव या निविदा मागे घेत नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. याही वेळी सिंगापूर सरकारच्या मालकीच्या पोर्ट ऑफ सिंगापूरनेच सर्वाधिक महसूल देणारी निविदा भरल्याने सिंगापूर पोर्टला चौथ्या बंदराचे काम देण्यात आलेले आहे.२०१४ ते २०१७ दरम्यान या बंदराचे काम पूर्ण करण्याचा संकल्प यापूर्वी करण्यात आलेला होता. तर या बंदराच्या निर्मितीमुळे हजारो रोजगार निर्माण होणार असल्याने या नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी येथील स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात आहे. त्यासाठी बंदराच्या निर्मितीपूर्वी प्रशिक्षण द्यावे, अशीही मागणी करण्यात आलेली आहे.

Story img Loader