नोकरीनिमित्त भारतातून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या नोकरदारांसाठी ठरवून दिलेला व्हिसाचा कोटा संपुष्टात आल्याने तेथील कंपन्यांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या हजारो तरुणांची अमेरिकावारी एक वर्ष लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे वर्षभरासाठी मिळालेला हा सक्तीचा ‘ब्रेक’ कोचिंग क्लासेसपासून छोटय़ा-मोठय़ा कंपनीत काम करून कारणी लावण्याचे पर्याय नवपदवीधरांना आजमावे लागत आहेत.
यापैकी बहुतांश विद्यार्थी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या नामवंत अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेचे आहेत. परदेशवारीचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी आयआयटीमध्ये दाखल होतात. ही नोकरी जर अमेरिकेत असेल तर सोन्याहून पिवळे. अनेकदा ‘कॅम्पस प्लेसमेंट’मधून हे स्वप्न साकार होते. पण, परदेशातील नोकरदारांसाठीचा अमेरिकेचा ‘एच१-बी’ या व्हिसाचा कोटा यंदा लवकर संपल्याने या उमेदवारांच्या करिअरला वर्षभराचा ब्रेक बसला आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अन्य देशांमधील शाखांमध्ये या उमेदवारांना तात्पुरते रुजू करुन घेण्यात येत आहे. लिंकडेन कंपनीने ‘कॅम्पस प्लेसमेंट’मधून निवडलेल्या उमेदवारांना आपल्या बंगळुरू येथील कार्यालयात काम सुरू करण्यास सांगितले आहे. तर ‘फेसबुक’ने आपल्या नव्याने नियुक्त केलेल्या उमेदवारांना कॅनडा, तर ‘गुगल’ने युरोपमधील आपल्या ठिकठिकाणच्या कार्यालयात रूजू होण्यास सांगितले आहे. अमेरिकेबाहेर कुठेही कार्यालय नसलेल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळालेल्या उमेदवारांना मात्र एक वर्षांच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही. पण, जागतिक मंदीमुळे पुढील वर्षी तरी आपल्याला कामावर घेतले जाईल ना? अशी भीती या उमेदवारांच्या मनामध्ये दडली आहे.
पदवी घेऊन घरी बसण्याऐवजी रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी हे उमेदवार आजमावून पाहत आहेत. ‘मला एका अमेरिकी कंपनीकडून ऑफर आहे. व्हिसा नसल्याने मला आता या कंपनीत रूजू होणे शक्य नाही. पण, घरी बसण्याऐवजी मी फ्लिपकार्ट या कंपनीत वर्षभरासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांने सांगितले. या कंपनीने आपल्याला पुढील वर्षी रूजू होण्यास सांगितले आहे. पण, कदाचित मी आहे त्या ठिकाणीच राहीन, असे या उमेदवाराने सांगितले. आयआयटीचे असेच काही विद्यार्थी कोचिंग क्लासेसचाही पर्याय स्वीकारत आहेत. आयआयटी प्रवेशाचे आकर्षण वाढल्याने सध्या कोचिंग क्लासेसमध्ये या विद्यार्थ्यांना बरीच मागणी आहे. आयआयटीयन्सना कोटय़वधी रुपयांचे पॅकेज द्यायला क्सासचालकही तयार असतात.त्या तुलनेत उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अमेरिकावारीची इच्छा लवकर पूर्ण होते. कारण, विद्यार्थी व्हिसाला तसा कोटा लागू होत नाही. पण, एकदा का हे विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले की तिथेच स्थायिक होतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक वर्षांचा कामासाठी व्हिसा मिळतो. त्यानंतर आपल्या व्हिसाची काळजी घेणाऱ्या कंपनीत नोकरी धरून ही मुले तिथेच कायमची स्थायिक होतात, असे वीर जिजामात तंत्रशिक्षण संस्थेचे संचालक जे. डी. यादव यांनी सांगितले.
कोटा संपला
अमेरिकेतील परदेशी नोकरदारांसाठी ‘एच१-बी’ व्हिसा घ्यावा लागतो. त्यासाठी कमाल मर्यादा दरवर्षी ६५ हजार व्हिसा इतकी असते. सप्टेंबर, २००८ च्या मंदीनंतर ही मर्यादा संपण्याकरिता सात ते १० महिने लागत. पण, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी हा कोटा लवकर म्हणजे ११ जूनलाच संपल्याने उमेदवारांची अडचण झाली आहे. व्हिसासाठी वेळेत अर्ज करता यावा यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना पदवीचे ‘शक्यता प्रमाणपत्र’ देतात. पण, व्हिसा मिळण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयोगी पडत नाही. त्यामुळे, अनेकदा पदव्युत्तरचे विद्यार्थी आपल्या बी-टेकच्या पदवीच्या आधारे व्हिसा मिळवितात.

Story img Loader