कोकण रेल्वेने डोंगरांच्या रांगा फोडल्या आणि कोकण रेल्वेचे काम पूर्ण केले. मात्र नवीन पनवेल आणि पनवेल शहरांना रेल्वे रुळांखालून जोडणारा मार्ग एका खडकामुळे पूर्ण होऊ शकला नाही. या मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. हा मार्ग झाल्यास सध्याचा नवीन पनवेल पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होईलच त्यासोबत इंधनाची बचत होईल. त्याचप्रमाणे एक किलोमीटरचा वाहनचालकांना करावा लागणाऱ्या द्राविडीप्राणायामातून मुक्ती मिळेल. मात्र हा भुयारी मार्ग बनविण्यासाठी प्रशासनाकडून टोलवाटोलवी चालली आहे. नवीन पनवेलकरांवर नेहमी वाहतुकीच्या समस्येसाठी प्रशासनाकडून दुजाभाव केला जात आहे. सिडको वसाहतींसारखे नवीन पनवेलमध्येही तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे चालत नाहीत. नवीन पनवेलकरांचे दुर्भाग्यामुळे येथे शेअररिक्षाही सुरू नाहीत. त्यामुळे डीमार्ट येथे राहणाऱ्या प्रवाशांना रेल्वेस्थानक गाठण्यासाठी २५ रुपये रिक्षा भाडे द्यावे लागतात. नवीन पनवेलमधून पनवेलकडे जाण्यासाठी अभ्युदय बँकेकडून एक भुयारी मार्ग काढण्याची योजना रेल्वेने हाती घेतली होती. मात्र या भुयारी मार्गाच्या कामात अचानक दगड लागला. त्यानंतर या दगडाला फोडण्याचे काम सुरू झाले. दगड भला मोठा असल्याने अखेर प्रशासनाने हात टेकले. दगडाचा तिढा न सुटल्याने हा होणारा भुयारी मार्ग आजपर्यंत रखडला आहे. याबाबत रेल्वेप्रवाशांसाठी झटणारे राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव संजय गंगनाईक यांनी मध्यरेल्वेकडे पाठपुरावा केला. रेल्वेप्रशासनाने गंगनाईक यांना दिलेल्या उत्तरात सिडको हे काम करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र सिडकोने हे काम आपल्या अखत्यारीत येत नसून ते काम अन्य प्रशासनाकडून करणार असल्याकडे बोट दाखविले. खांदा कॉलनी येथील बालभारती कडून पनवेलच्या अमरधामकडे जाण्यासाठी असणाऱ्या मार्गावर असाच एक भुयारी मार्ग नागरिकांच्या हिताचा बनला आहे. याचपद्धतीने नवीन पनवेल अभ्युदय बँकेसमोरील भुयारीमार्ग बनल्यास प्रवाशांची सोय होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा