महाराष्ट्र बसव परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘बसवज्योती संदेश यात्रे’चे सोमवारी (दि. २६) सद्गुरु डॉ. बसवलिंग पट्टदेवरु यांच्यासह नगरमध्ये आगमन होत आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात सोमवार व मंगळवारी महाजन गल्लीतील ज्ञानेश्वर सभागृहात विविध कार्यक्रम होत असल्याची माहिती जिल्हा स्वागत समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी दिली. सोमवारी दुपारी ४ वाजता गांधी मैदानात बसवज्योतीचे आगमन होईल, तेथून प्रमुख मार्गावरुन शोभायात्रा काढली जाईल. सोहळ्यानिमित्त सद्गुरु प्रथमच नगरमध्ये येत आहेत. मंगळवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता सामूहिक इष्टलिंग पूजा व दिक्षा विधी सोहळा होईल. नंतर दुपारी २ वाजता संदेश यात्रा बीडकडे रवाना होईल. महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीस यंदा नऊशे वर्षे पूर्ण होत आहेत, तसेच पहिल्या सार्वजनिक बसव जयंतीस यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत, याच्या निमित्ताने महाराष्ट्र बसव परिषदेच्या पुढाकाराने ही ज्योतयात्रा २५ ऑक्टोबरला लातूर येथून सुरु झाली आहे.

Story img Loader