महात्मा बसवेश्वर यांनी वर्णभेदाचा विरोध करून लोकसभा प्रणालीची स्थापना केली होती.त्यावेळी स्त्री समानता,अंधश्रद्धा व भ्रष्टाचाराचा विरोध करून शिक्षणाची दारे सर्वासाठी खुली केली होती,परंतु त्यांच्या विरोधकांनी तत्कालीन सर्व साहित्य जाळल्यामुळे ही बाब १९२३ साली उशिरा जगापुढे आली. या कार्याची दखल घेत लंडनच्या पार्लमेंटमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती बसव परिषदेचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरू(अप्पाजी) यांनी येथे दिली.
महाराष्ट्र बसव परिषदेच्या वतीने राज्यात आयोजित बसवज्योती संदेश यात्रेचे येथे आगमन झाले. यावेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अमरनाथ सोलपुरे, महालिंग देवरू, गुरु बसवदेव उपस्थित होते.
बाराव्या शतकात कर्नाटकात बसवेश्वरांनी मोठे कार्य केले आहे. त्यावेळी समाजात जाती-धर्म,स्त्री-पुरूष,गरीब-श्रीमंत असे भेदभाव प्रचलित होते. वयाच्या आठव्या वर्षी आपल्याप्रमाणेच बहिणीची मुंज व्हावी, तिलाही जानवे घालावे, हा बसवेश्वरांचा हट्ट धर्मरीतीप्रमाणे पूर्ण झाला नाही. त्यामुळे त्यांनी गाव सोडले.त्यानंतर ते भ्रमण करत महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे आले. तेथेच विद्येची आराधना करतानाच नवसमाज निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. सर्वाना शिक्षण,महिलांना विद्या व उपदेशाचा अधिकार,अंधश्रद्धेचा विरोध,अतिरिक्त धन समाजोपयोगी यावे याबाबत त्यांचे उपदेश आजही प्रासंगिक आहेत.
विश्वमानव धर्म निर्माण करण्यासाठी बसवेश्वरांनी दीनदलित, गरीब, दु:खी समाजातील ७१० जातींना समानतेचा अधिकार मिळवून दिला होता. आजपासून ८०० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ”अनुभव मंडप”चा अध्यक्ष एक बहुरूपी होता.त्यावेळी एक लाख ९६ हजार प्रचारक(जंगम) विश्वधर्माचा प्रचार व प्रसार करीत होत असे त्यांनी सांगितले.
बसवेश्वरांनी मंदिर बांधण्यास किंवा मूर्तीची पूजा-अर्चा करण्यास विरोध केला. त्याच सोबत आपले गुरू,आपले देव,आपण स्वत:च आहोत, असा उपदेश करून अंगावर लिंग स्थापन करून पूजा करण्याची परंपरा सुरू केली. मात्र, बसवेश्वरांनी सुरू केलेली ही क्रांती त्यांच्यानंतर क्षीण झाली. त्यावेळी काही सेवकांनी बसवेश्वरांचे साहित्य जतन करण्यासाठी लपवून ठेवले होते, ते साहित्य १९२३ मध्ये सापडले. त्यानंतर जगातील सवार्ंत पहिली लोकशाही भारतात बसवेश्वरांनी सुरू केली, सत्य जगापुढे आले. हे सर्व साहित्य कन्नड भाषेत असून,२२ भाषांमध्ये अनुवाद करण्याचे काम सुरू झाले आहे, असे अप्पाजी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा