अकोला महापालिकेच्या निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेत घमासान होण्याची चिन्हे आहेत. सत्तारूढ महाआघाडीचा मुख्य घटक असलेल्या काँग्रेस पक्षात व विरोधात असलेल्या भाजपमध्ये अनेक दावेदार झाल्याने सत्तारूढ व विरोधी पक्षात बेबनाव होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, विरोधी पक्षातही सदस्य पाठविण्याच्या मुद्यावरून एकमत नसून तेथेही वाद होण्याची चिन्हे आहेत.
सत्तारूढ काँग्रेसच्या एक सदस्य स्थायी समितीत जाणार आहे. या एका पदावर अनेकांची नजर आहे. काँग्रेस गटनेते दिलीप देशमुख यांचा यावर प्रबळ दावा असून महाआघाडीचे अध्यक्ष व काँग्रेस शहर अध्यक्ष मदन भरगड यांनीही त्यांचा दावा एका माजी मंत्र्यामार्फत प्रदेशात केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दोन गटांपैकी कोणाची सरशी होते, याकडे सर्वाची नजर लागली आहे. मदन भरगड हे आघाडीचे गटनेता असल्याने ते ज्या कोणाचे नाव पाठवतील ते अंतिम असेल. त्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये या मुद्यावरून घमासान होण्याची चिन्हे असून वेळप्रसंगी महापालिकेत शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या नेमके काय होते, याकडे सर्वाचे लक्ष आहे. राष्ट्रवादीतर्फे अजय रामटेके यांचे नाव निश्चित होण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे नेते राजकुमार मुलचंदानी यांना सभागृह नेतेपद महाआघाडीने दिले असल्याने त्यांना वगळण्याची गरज आता पक्षातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतरांना संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. अकोला विकास आघाडीचे एक सदस्य हाजरा बी अब्दुल रशिद यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली. अपक्ष नगरसेवक संजय बडोणे यांना यावेळी संधी देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतर्फे शरद तुरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा पक्षात आहे. माजी सभापती विजय अग्रवाल किंवा त्यांच्या पत्नी सुनिता अग्रवाल स्थायी समितीच्या पुन्हा सदस्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या दोन सदस्यांचा स्थायी समितीत प्रवेश होईल. या दोन पदांसाठी मोठी रस्सीखेच होत आहे. नव्याने आलेले आशिष पवित्रकार यांना संधी देण्याची गरज आहे, पण आशिष पवित्रकार यांना डच्चू देण्याची व्यूहरचना पक्षात आखली जात आहे तसे होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही सदस्य जुने शहरातून देण्याची चर्चा पक्षात झाली. योगेश गोतमारे की सतीश ढगे, असा प्रश्न पक्षासमोर आहे, तर सारिका जयस्वाल, राहुल देशमुख यांच्या नावाची चर्चा पक्षात सुरू झाली. भाजपमध्ये या मुद्यावरून अंतर्गत घमासान आहे. उद्या, महापालिकेत सकाळी ११ वाजता या विषयीसाठी महापालिकेत आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे.