लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे शहराच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असताना श्रेय घेण्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे नितीन गडकरी यांची उमेदवारी घोषित झाली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून प्रचार सुरू केला आहे. आम आदमी पक्षाने यापूर्वीच अंजली दमानिया यांची उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसकडून खासदार विलास मुत्तेमवार यांचे नाव जवळपास निश्चित असून त्यांच्या नावाची केवळ घोषणा होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील विविध विकास कामांना प्रारंभ करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. नुकतेच उत्तर आणि पश्चिम नागपुरातील सिव्हर झोनसाठी केंद्र सरकारकडून आलेल्या निधीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. एनएनएनयूआर अंतर्गत सुरू असलेल्या काही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना त्याचे किंवा शहरात बांधण्यात आलेल्या समाजभवनाचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. दहीबाजार पूल हा केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने बांधण्यात आला त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते घाई घाईने उद्घाटन केले. त्या उद्घाटनानंतर भाजपाने आक्षेप घेत पुलाचे काम पूर्ण व्हायचे असल्यामुळे तो बंद केला आणि त्यानंतर पुलाचे काम पूर्ण झाल्यावर भाजपने त्या पुलाचे महापालिकेतर्फे रितसर उद्घाटन केले जाईल असे जाहीर करून भाजप त्याचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शहरात जेएनएनयूआरएमतंर्गत अनेक योजना सुरू असताना त्यासाठी केंद्राकडून निधी येत असतो. हा निधी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या पाठपुराव्यामुळे येत असल्याचे काँग्रेसचे नेते म्हणत असतील तरी भाजपचे नेते मात्र नितीन गडकरी आणि महापौर अनिल सोले यांच्या प्रयत्नातून अनेक योजना आणल्याचे सांगत आहेत. शहरातील रस्त्यांची कामे असो की कुठल्याही समाज भवनाचे भूमिपूजन असो, गेल्या आठ दिवसांपासून शहरात काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेय घेण्याचे राजकारण सुरू झाले आहे. या संदर्भात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले, महापालिकेत जेएनएनयूआरएमतंर्गत ज्या योजना राबविल्या जात आहे त्यासाठी केंद्राकडून निधी आणला जात आहे. या निधीसाठी खासदार विलास मुत्तेमवार पाठपुरावा करीत असल्यामुळे तो महापालिकेला मिळत आहे. त्यामुळे कुठल्याही योजनेचे श्रेय भाजपच्या नेत्यांनी घेऊ नये. दुसरीकडे भाजपचे नेते निवडणुकीच्या पूर्वी शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत असून त्याचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या श्रेयाच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीत कोणाला यश मिळेल हे लवकरच समोर येणार आहे.

Story img Loader