प्रेम कसं असावं? राधेसारखं की मीरेसारखं.. अशी तुलना नेहमीच केली जाते. खरं तर दोघींचंही प्रेम तरल आणि निरलस असंच होतं. पण, आजच्या युगात कृष्णाची रुक्मिणी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना राधेच्या आणि मीरेच्या प्रेमाचे तत्त्व पटेल. या आजच्या पिढीसाठी त्यांच्यातीलच एका राधेच्या प्रेमाची गोष्ट सांगणारी ‘राधा ही बावरी’ नावाची नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर सोमवार, २४ डिसेंबरपासून दाखल होते आहे.
लहानपणापासून आईवडिलांच्या प्रेमासाठी झगडणारी, स्वत:ला शिक्षणाच्या आणि करिअरच्या कोषात ओढून घेतलेल्या निष्णात डॉक्टर राधाला जेव्हा प्रेमाचा परीसस्पर्श होतो तेव्हा तिच्या अंतरंगात काय वादळ उठतं? असं अवचितपणे वाटय़ाला आलेले प्रेम तिला आयुष्याचा जोडीदारही मिळवून देतो का? अशा भावनिक गोष्टींची गुंतागुंत या नवीन मालिकेत पाहायला मिळणार आहे.
‘उंच माझा झोका’ या मालिकेनंतर दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान ‘झी मराठी’साठी या बावऱ्या राधेच्या प्रेमाची कथा दिग्दर्शित करणार आहे. या मालिकेची संकल्पना झी मराठीच्या सर्जनशील टीमची असून निर्मिती पिकोलो फिल्मसची आहे.
‘राधा ही बावरी’ या मालिकेत राधेची मुख्य भूमिका श्रुती मराठेने केली असून तिच्याबरोबह सौरभ गोखले, शरद पोंक्षे, अमोल बावडेकर, नेहा पेंडसे, अश्विनी एकबोटे, कविता मेढेकर, इला भाटे, आशित आंबेकर, बाळ कर्वे यांच्या भूमिका आहेत. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाहायला मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा