‘बे दुणे चार’ हे गणित म्हणून बरोबर असलं तरी जेव्हा दोन व्यक्ती एका नात्यात बांधून घेतात तेव्हा निदान दोन्ही बाजूंची मिळून दहा मंडळी तरी त्यांच्यासोबत जोडली जातात. आणि म्हणून या अर्थाने सुनील बर्वे आणि सोनाली खरे हे दोघंही ‘बे दुणे दहा’ हा रोजच्या चोवीस तासातून साठ मिनिटांसाठी चालवला जाणारा नवा कौटुंबिक पाढा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आपल्यासमोर वाचणार आहेत. ‘चेकमेट’नंतर ईटीव्हीचा रिअॅलिटी शो वगळता सोनाली जणू गायब झाली होती. तर सुनील बर्वेही बऱ्याच दिवसांनी एका हलक्या-फुलक्या मालिकेत दिसणार आहे. ‘एकेरी पालकत्व’ आणि अशा दोन एकेरी पालकांच्या एकत्र येण्यातून खरोखरच ‘बे दुणे दहा’चा पाढा जमू शकतो का?, हा मालिकेचा विषय आहे. पण, यानिमित्ताने सोनाली आणि सुनीलची याविषयी नेमकी मतं काय आहेत.
सोनाली स्वत: एका मुलीची आई आहे. त्यामुळे तिचं संगोपन, संसारातील जबाबदाऱ्या आणि आपली कारकीर्द हे त्रिकूट जमवून आणण्यासाठी माझी कसरत सुरू असते. त्यामुळे मालिकेत माझ्या विभावरी या व्यक्तिरेखेशी जोडून घेणं मला सहज जमतं. म्हणजे एक आई म्हणून विभावरीला जी काळजी वाटते ती मी स्वत: अनुभवलेली आहे. किंबहुना विभावरीकडून मला बऱ्याचदा ‘पालकत्वा’च्या बाबतीत शिकायलाही मिळतं, असं सोनाली सांगते. तर जे जे एकटे पालक आहेत त्या सगळ्यांना माझा सलाम आहे, अशी भावना सुनीलने व्यक्त केली. एकटे पालक ही आपल्याकडची वाढत चाललेली समस्या आहे आणि ती कुठेतरी थांबली पाहिजे, असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचं त्याने सांगितलं. पती-पत्नी दोघं मिळून मुलांचं संगोपन करत असतात तरी सगळ्या गोष्टी त्यांना जमतात असं नाही. मग एकतर अपघातामुळे किंवा घटस्फ ोटांमुळे एकेरी पालकत्व वाटय़ाला आलेलं असतं. म्हणजे आधीच त्यांच्या मनावर एक खोल घाव असतो. आणि त्यातही त्यांनी आपल्या मुलासाठी आई-बाबा दोघांचीही भूमिका निभवायचं आव्हान त्यांच्या खांद्यावर असतं. अशावेळी त्यांच्या मनालाही उभारी द्यायची गरज असते. या मालिकेतून कुठेतरी ते साधलं जाईल, असं सुनीलला वाटतं.
‘बे दुणे दहा’चं शीर्षकगीतही या दोघांनीच गायलं आहे. म्हणजे सुनीलमध्ये दडलेल्या गायकाची माहिती सगळ्यांना आहे. तर ‘गाणं माझ्या घरातच आहे’, असं सांगत सोनाली सुखद धक्का देते. सोनालीने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. तिची आई शास्त्रीय गायिका होती. तर मामा गोविंदराव पटवर्धन मोठे हार्मोनिअम वादक होते. आईचं तर अजूनही म्हणणं आहे की गाणं जप.. त्यामुळे मालिकेचे शीर्षकगीत गाणार म्हटल्यावर आईला खूप आनंद झाला होता, असे सोनाली सांगते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा