मराठी गझललेखक, संगीतकार आणि गायक अशा तिहेरी भूमिकांमधून रसिकांना भुरळ पाडणारा शिरीष कुलकर्णी याचा ‘सांजधून’ हा गझलांचा कार्यक्रम आज (रविवारी) पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या प्रांगणात होत आहे. त्यानिमित्त..
ढगाळलेल्या सांज उजेडी मनात काही अद्भुत होते
धगधगलेले प्राणपाखरू स्तब्ध, निरामय, अवधूत होते
सुटीच्या दिवशीची संध्याकाळ असो अथवा दिवसभराचे काम संपल्यानंतर उगाचच मनात रेंगाळणारी सायंकाळ असो, त्या वेळी मनात भावभावनांचा जो कल्लोळ उठतो, त्या कल्लोळाचे आपल्या गझलेतून यथार्थ वर्णन केले आहे ते उदयोन्मुख गझलकार शिरीषने. गझललेखनाबरोबरच गझलगायकीमध्ये शिरीष कुलकर्णी हे नाव आता श्रोत्यांच्या आणि चाहत्यांच्या परिचयाचे होऊ लागले आहे. सॉफ्टवेअर कन्सल्टंटची नोकरी करणारा शिरीष गझलच्या क्षेत्रातदेखील आपला वेगळा ठसा उमटवतो आहे.
गझललेखक, गझलगायक, संगीतकार अशा तिहेरी भूमिका पार पाडणारा शिरीष मूळचा सांगलीचा. नोकरीनिमित्त त्याने औरंगाबादमध्ये अनेक वर्षे वास्तव्य केले. आपली संगीत कारकीर्द आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने औरंगाबादकरांना प्रभावित केले आणि आता तो पुणेकर झाला आहे. आपल्या गझलगायकीने पुणेकरांना मंत्रमुग्ध करीत, त्याने पुण्यामध्ये ‘सांजधून’ या गझलांवर आधारित कार्यक्रमांचे सादरीकरण सुरू केले. पुणेकर रसिकांना आज (दि. १७) आपली संध्याकाळ रमणीय करण्याची संधी शिरीषच्या ‘सांजधून’ या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. ज्या कार्यक्रमाची वाट रसिक पुणेकर पाहत होते, तो आज पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता होणार आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये शिरीष पुण्यात स्थायिक झाला. तेव्हापासून स्वत:चे व्यक्तिमत्त्व सांगीतिकदृष्टय़ा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न २००९ पर्यंत तो करीत होता. संगीताची मूळची आवड आणि या आवडीमध्ये ज्ञानाची भर घालण्यासाठी उत्तमोत्तम वाचन, उत्तम संगीत ऐकणे, रियाझ आणि पोटासाठी नोकरी हे सगळं तो करत होता. २००९ मध्ये कबिरांच्या विचारांवर आधारित ‘झिनी-झिनी’ हा सांगीतिक कार्यक्रम त्याने पहिल्यांदा केला आणि त्यानंतर मागे वळून बघितलेच नाही. वयाच्या अठराव्या वर्षांपासून त्याने संगीत शिक्षण घ्यायला सुरुवात केली. स्वामी धर्मवत तथा श्यामराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे, तर तबल्याचे धडे दत्ता गुरव यांच्याकडे त्याने गिरवले आहेत.
शिरीषचे वडील इंग्लिशचे प्राध्यापक, तर आई गृहिणी. वडिलांमुळे इंग्लिशबरोबरच मराठी विषयांवरचे त्याचे वाचन लहानपणापासूनच सुरू होते. त्या वाचनांमधील भावभावनांचे प्रकटीकरण तो आता गझलांच्या रूपाने करतो आहे. मराठी गझलांमध्ये भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतात, म्हणून मराठीतच गझललेखनाचा तो नेहमी आग्रही राहिला आहे. प्रत्येकालाच आपण कोण, कोठून आलो, कुठे जाणार, आपण कसे आहोत असे एक ना अनेक प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरे आणि त्याबद्दल भाष्य करणारी शिरीषची अशीच एक गझल-
मी कसा आहे,
कळाया शोध घेतो
‘तू तसा नाहीस’,
जो तो बोध देतो!
आपल्या गझललेखनामध्ये वैविध्य यावे म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या शिरीषला लहानपणापासूनच वाचनाची आवड. अध्यात्मापासून मानसशास्त्रापर्यंत विविध विषयांवर वाचन त्याने केले आहे. गझललेखनाला खरंतर त्याने दोन वर्षांपूर्वीपासूनच सुरुवात केली असली, तरी भारंभार लिहिण्यापेक्षा मौलिक लिहावे याकडे असलेला त्याचा झुकलेला कल गझला ऐकताना जाणवत राहतो.
शिरीषचे लेखन पहिल्यापासूनच वेगळ्या धाटणीचे, पण सर्वसामान्यांना न समजणारे, असे असले तरी मराठी गझललेखनात मात्र दुबरेधता येणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच त्यामध्ये सहजता येईल, कृत्रिमतेपासून त्या दूर राहतील यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्याने सर्वप्रथम गद्यलेखनाला सुरुवात केली, ती महाविद्यालयीन जीवनात. त्याच्या एकंदर लेखनामध्येच आत्मशोधाचा प्रवास जाणवत राहतो, त्याच्या काही गझलादेखील काहीशा त्याच अंगांनी जातात.
हे बरे, गुंतावयाला ना कुणी,
सोडण्या, सोबत, कराया ना कुणी
फार नाही, फक्त हे सांगू कुठे
बोलण्याविण बोलण्याला ना कुणी
ही आणि अशाच भावनावश करणाऱ्या शिरीषच्या गझला ऐकणाऱ्याचे भान हरवायला लावण्यापेक्षाही स्वसंवाद साधायला कारणीभूत ठरतात. तसेही शिरीषने त्याच्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या मैत्रिणीला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मदत करताना ‘गुरुबोध’ नावाने काही लेखनपण केले होते.
श्वासाने मंतरलेली ही रात्र कधी संपूच नये, ही शिरीषचीच एक गझल. या गझलेनुसारच त्याच्याशी सुरू असलेल्या गप्पा, त्याच्या गझलांचा कार्यक्रम, त्यातून एका वेगळ्याच धुंदीत रममाण होणे कधी संपूच नये, असेच वाटत राहते. पण ते कोणालाच शक्य नसल्यामुळे त्याच्या गझला गुणगुण्यात, त्याचा आनंद घेण्यात आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, हेच खरे.