मेळघाटात पाच वाघांच्या शिकारीचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आलेले असताना आणि त्यात पाच आरोपींना अटक झालेली असतानाच या जिल्ह्य़ातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान वनपरिक्षेत्रातही वीज प्रवाह लावून अस्वलांची शिकार करणाऱ्या टोळीला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी काल अटक केली असून याप्रकरणी दोन वन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.  
सविस्तर वृत्त असे की, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातील पवनी-धाबे राऊंडचे राखीव वन कक्ष क्रमांक ७२८ मध्ये वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी झासीनगर रून तिडकाकडे जाणाऱ्या विद्युत लाईनवर आरोपींनी वायर टाकून वीज प्रवाहाच्या सहाय्याने अस्वलाची शिकार करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना वन अधिकाऱ्यांनी २९ जूनला सायंकाळी अटक केली आहे. २६ जूनला वन अधिकाऱ्यांना १०-१५ दिवसांपूर्वी अस्वलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने वनखात्यात खळबळ उडाली होती. १०-१५ दिवसांपूर्वीच शिकार झालेल्या अस्वलाची साधी माहिती पवनी राऊंडच्या अधिकाऱ्यांनाच नसल्याने कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून आर.ओ. बरबटे, वनरक्षक कोचे व वनमजूर पुराम यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार लटकत आहे. पंचनामा करून या कुजलेल्या अस्वलाला जाळण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सखोल चौकशीअंती वीज प्रवाहाच्या सहाय्याने ही शिकार केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे या टोळीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या टोळीतील आरोपीत जलीराम निरू मळकाम (४०,  रा.झासीनगर), पांडु मंगल परसो (४०) व हिरालाल मगरू परसो (३२, दोन्ही रा.चुटीया-पळसगाव) यांना अटक करून त्यांच्याकडून वायर हस्तगत करण्यात आला आहे. प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी मनोहर गोखले, वन परिक्षेत्राधिकारी कुलकर्णी, आर.ओ.धोटे यांनी त्यांच्यावर वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार १०-१५ दिवसांपूर्वी आरोपी जलीराम हा चुटीया येथील हिरालालकडे दुपारच्या सुमारास आला. सायंकाळी दोघांनाही दारू पिऊन जेवण केले व झासीनगर-तिडका विद्युत लाईनवर टीसीएम नालीवर वीज प्रवाहाच्या सहाय्याने आपण डुकराची शिकार करण्याचे ठरवले. घटनास्थळावर तिन्ही आरोपींनी सुमारे १०० ते १५० मीटर जिवंत विजेची तार पसरविली. नंतर त्याच रात्री शिकारीसाठी लावलेल्या तारांकडे पहाटे ३-४ वाजता घटनास्थळी पोहोचताच अस्वल मरून पडलेले दिसले. डुकराऐवजी अस्वलाची शिकार झाल्याने तिन्ही आरोपी घाबरून वीज तार अर्धवट गुंडाळून माघारी आल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्या ठिकाणी अस्वलाशिवाय ५ गावठी कुत्रेही मरण पावले. या परिसरातील वन कर्मचारीच मुख्यालयी राहत नसल्याने शिकाऱ्यांना मोकळे रान मिळाल्याची चर्चा सुरू आहे. आरोपींना अर्जुनी मोरगाव येथे न्यायदंडाधिकाऱ्यांकडे नेण्यात आले आहे.
हे प्रकरण संवेदनशील असल्याने उपवनसंरक्षक एस.व्ही.रामाराव यांनी वनमजूर छननु ए.पुराम, गार्ड पी.के.कोचे यांना तातडीने निलंबित केले आहे. वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.आर.बरबटे यांना निलंबित करण्याचे अधिकार वरिष्ठांना असल्याने त्यांचा उलट टपाली अहवाल कारवाईसाठी नागपूर कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.

Story img Loader