मनसे पदाधिकारी व विन इन्व्हेस्टमेंटचे संचालक विजय मराठे यांनी गावगुंडांच्या हातून मारहाण केल्याचा आरोप जाणता राजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन उदार यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठे यांनी सर्वसामान्य जनतेकडून इन्व्हेस्टमेंटच्या नावावर कोटय़वधी रुपये गोळा केले असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली.
स्टॉक गुरू इंडियाच्या माध्यमातून देशभरात गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महाठग खरेचे पिलावळ शहरात राजरोसपणे फिरत आहेत. अशाच फायनान्स कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी जाणता राजा संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली. विन फायनान्सचे विजय मराठे हे धमकी देत लोकांचे पैसे परत देत नसल्याच्या तक्रारीही दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांकडून नोंदल्या गेल्या. पोलीस विभागाकडून त्या तक्रारीची अजूनही चौकशी सुरू आहे. नितीन उदार यांनी या प्रकरणाची तक्रार आयकर विभागाकडे  तसेच तुकूम व दुर्गापूर येथील जड वाहतुकीची तक्रारही नोंदवली होती. र्निबध असलेल्या वेळेत तुकूम परिसरात ट्रक चालवणाऱ्यांना अटकाव केला असता मराठे व त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप उदार यांनी केला आहे. केवळ मराठे यांच्या तक्रारी केल्या म्हणूनच त्यांनी आपणावर हल्ला केल्याचेही उदार यांनी म्हटले आहे.याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली  आहे.