परप्रांतीय आइस्क्रीम विक्रेत्यास शिर्डीतील एका सांजदैनिकाच्या संपादकाने रिव्हॉलवरचा धाक दाखवून, पळवून नेऊन अंगरक्षकाच्या मदतीने गज, काठय़ा व बॅटने अमानुष मारहाण करुन गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास शिर्डी शहरात ही घटना घडली. याबाबत सायंदैनिकाच्या संपादकास पोलिसांनी अटक करुन अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पोलिसांनी फिर्यादीची खरी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त झालेल्या शिर्डीतील नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर नगरमनमाड महार्गावर रस्तारोको आंदोलन करुन पोलीसांच्या कृत्याचा निषेध केला. या घटनेबाबत योग्य कारवाई न केल्यास येत्या दोन दिवसात शिर्डी पोलीस स्टेशनवर महिलांचा बांगडय़ा मोर्चा आणू अशा इशारा यावेळी कैलासबापू कोते यांनी दिला.
लोकचंदाणी याने काल (सोमवार) आइस्क्रीम घेतले त्याचे जास्त बिल मागितल्याच्या कारणावरुन त्याने आइस्क्रीम विक्रेता राजुराम धर्माराम बिष्णोई (वय ३५) यास मारहाण करून त्याला रिव्हॉल्वरचा धाक दाखवला.  स्वत:च्या टाटा सफारी मोटारीत (क्रमांक एमएच १६ एम ७७) बसवून शहराबाहेरील हॉटेल मातोश्रीवर नेले, तेथे पाच ते सहाजणांनी गज, काठय़ा व क्रिकेट बॅटने अमानुष मारहाण केली. घटनेची माहिती शिर्डीत समजताच रात्री शे-दीडशेचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला. आरोपी जितू लोकचंदाणी वर जमाव चाल करण्याआधीच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. मात्र संतप्त जमावाने लोकचंदाणीच्या गाडीवर दगडफेक करुन तिचे नुकसान केले. माजी नगराध्यक्ष कैलास कोते व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावास शांत केल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता हा जमाव मागे गेला.
पोलिसांच्या कृत्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. येथे सभाही झाली. कोते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर टीका केली. नगरसेवक राजेंद्र कोते, मनसेचे शहराध्यक्ष दत्तात्रय कोते, शिवराज्य पक्षाचे सचिन चौगुले, राष्ट्रवादीचे नीलेश कोते, अशोक कोते, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेशभाऊ गोंदकर यांची भाषणे झाली. विभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको मागे घेतला.

Story img Loader