नगर-पुणे राज्यामार्गावरील एसटीच्या अनधिकृत थांब्यावरील धाबेचालकांनी आता दादागिरीने दहशत सुरू केली आहे. शिरूरचे आगार व्यवस्थापक एस. एम. सुर्वे व स्थानकप्रमुख कदम यांच्यासह येथील प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या धाबेचालकांनी आज बेदम मारहाण करून येथून हुसकावून दिले. या मारहाणीत सहा कार्यकर्ते जखमी झाले असून या अधिका-यांसह कार्यकर्त्यांवर जोरदार दगडफेकही करण्यात आली.
या राज्यमार्गावर गंगासागर व विराज या दोन धाब्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे अनधिकृत थांबे सुरू आहेत. नगर व पुणे येथील प्रवाशांसह शिरूरच्या प्रवासी संघटनेने त्याविरोधात सातत्याने आवाज उठवला, मात्र एसटीच्या अधिका-यांच्या आशीर्वादाने सुरू असलेले हे थांबे खुलेआम सुरू आहेत. वाहक-चालकांचा आर्थिक फायदा आणि प्रवाशांची लूट असेच प्रकार या अनधिकृत थांब्यांवर सुरू आहेत. शिरूरच्या अधिकृत बसस्थानकात न थांबता हे चालक-वाहक या अनधिकृत थांब्यांवर बस थांबवतात.
शिरूर येथील अधिकारी सुर्वे, कदम व येथील प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आज दुपारी १ च्या सुमारास या अनधिकृत थांब्यांवर पाहणीसाठी गेले होते. येथे उभ्या असलेल्या बसच्या चालक-वाहकांशी चर्चा करीत असतानाच या दोन्ही धाब्यांच्या चालकांनी येथील कामगारांच्या मदतीने अधिका-यांसह कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यास सुरुवात करून नंतर काठय़ा व लाथा-बुक्क्य़ांनी त्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने सारेच गोंधळून गेले. परिस्थितीचा अंदाज घेऊन हे सर्व सुपे (पारनेर) पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास निघाले असता धाबेचालक व त्यांच्या गुंड कामगारांनी त्यांच्या बसवरही तुफान दगडफेक करून त्यांना मज्जाव केला, अखेर या सर्वानी शिरूरला येऊन पोलिसात फिर्याद दिली. या मारहाणीत प्रवासी संघटनेचे सहा कार्यकर्ते जखमी झाल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, तसेच बापू सानप यांनी सांगितले. एसटीच्या नगर येथील अधिका-यांचे या धाबेचालकांना अभय असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला. हे पथक गेले त्या वेळी नगर जिल्ह्य़ातील काही आगारांच्या बस या अनधिकृत थांब्यांवर उभ्या होत्या.