बारमध्ये झालेल्या वादातून दोघा भावांना लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. ही घटना पूर्णा येथे शनिवारच्या रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी पंचवीस जणांवर गुन्हे दाखल झाले असून एकाला अटक करण्यात आली आहे. पूर्णा येथे आज दिवसभर पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता.
पूर्णा येथील सिद्धार्थ नगरमधील महेंद्र काशिनाथ दीपक हा सरदार पटेल रस्त्यावरील विश्वरूप बारमध्ये बसला होता. यादरम्यान बाजूलाच बसलेल्या शेख नवाब, फेराज कानखेडकर याच्या गटासोबत महेंद्रचा वाद झाला. वादानंतर महेंद्र घराकडे निघाला असता त्याला सुमन मंगल कार्यालयाजवळ गाठून शेख नवाबच्या गटाने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर महेंद्रने घरी जाऊन आपला भाऊ मिलिंद यास बोलावून आणले. तोपर्यंत मारहाण करणारे डॉ. लाणगे चौकात आले होते. या वेळी मारहाणकर्त्यांनी दीपकबंधूंना लोखंडी गजाने मारहाण केली. मारहाणीत दीपक बंधू गंभीर जखमी झाले. महेंद्रच्या डोक्यावर लोखंडी गजाने वार झाल्याने तो बेशुद्ध पडला. मिलिंदच्या हाताचे हाड मोडले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन मारहाणकर्त्यांना ताब्यात घेण्यास जाताच शेख नवाबच्या गटाने पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलिसांच्या गाडीचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी राजू, फेरोज कानखेडकर, खय्यम, अफजल, बबलू, इशू पठाण, शेख नवाब, इरफान बागवान यांच्यासह पंचवीस जणांवर पूर्णा पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. यातील शेख नवाब यास पोलिसांनी रात्रीच अटक केली. रविवारी सकाळपासूनच शहरात तणावपूर्ण परिस्थिती असल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावून घेतली होती. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दुपारी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जखमी दीपकबंधूंना नांदेडला हलविण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वनाथ जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चौधरी, जमादार चंद्रकांत टाकरस हे करत आहेत.

Story img Loader