यंदा नवरात्रीच्या निमित्ताने रंगणाऱ्या गरब्यामध्ये गोंडे, टिकल्या, झालरी अशा नाना कलाकुसरींनी सजविलेल्या नजाकतदार ‘अनारकली’ घागडोची जर कुणाशी टक्कर असेल तर ती आहे, तितक्याच भारी कलाकुसरींनी नटलेल्या दणकट ‘रावडी राठोड’शी. कारण, हा दणकण रावडी राठोड घागडो, चणियाचोळीच्या बाजारात यंदा भलताच ‘इन’ आहे.
बंगाल्यांसाठी नवरात्रीचे मुख्य आकर्षण जसे दुर्गापूजेत असते तसे ते गुजरात्यांमध्ये रात्री रंगणाऱ्या गरब्यात असते. या गरब्याच्या निमित्ताने घागडो-चोळीला बाजारात मोठीच मागणी असते. घागडो-चोळीसाठी प्रसिद्ध असलेल्या मालाड, भुलेश्वर येथील बाजारपेठांमध्ये चक्कर मारल्यावर यंदा ‘रावडी राठोड’ नामक घागडोची चांगलीच धूम असल्याचे लक्षात येते.
कलाकुसरीच्या ज्या ज्या म्हणून काही वस्तू आहेत त्या या रावडी राठोडच्या घेरदार घागडोवर विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे, इतर घागडोंच्या तुलनेत रावडी राठोडचा लूक आणि वजन दोन्ही भारी आहे. या घागडोची टक्कर आहे नजाकदार अनारकलीची. बांधणी, बीड्स, लोकरीच्या धाग्यांची किनार, गोंडे, टिकल्या, अशा अनेक कलाकुसरीने अनारकली नटली आहे. रावडी राठोडचा ‘मॅचो’पणा त्यात नावालाही नसल्याने त्याचे स्वरूप थोडेसे नजाकतदार झाले आहे. हे दोन प्रकार यंदा नव्याने आले असले तरी सनेडो, मल्टी सनेडो, केडिया, टिक्का, बांधणी प्रकारचे विविध रंगाचे घागडोंनाही मागणी आहे, असे मालाडमध्ये ‘ज्युली कलेक्शन’ हे चनियाचोळीचे विक्रेते राजेश तुराखिया सांगतात.
मंदीचे ढग नवरात्रीच्या निमित्ताने फुललेल्या बाजारपेठेत मात्र विरळ झालेले दिसतात. पूजेच्या साहित्यापासून चणियाचोळी, घागरे, पुरूषांच्या गोंडेदार पगडय़ा, कुर्ते, पारंपारिक दागिने, दांडिया आदी वस्तूंची रेलचेलच बाजारात दिसून येते. लाल, निळा, काळ्या, हिरवा या भडक रंगाच्या घागऱ्यांना आजही सर्वाधिक मागणी आहे. चकचकत्या आरशांच्या जागी कमी खर्चाचे आबले, खऱ्याखुऱ्या कवडय़ांच्या जागी स्वस्तातल्या प्लॅस्टिकच्या कवडय़ा, मोती, टिकल्या, सोन्या-चांदीची जर वापरून घागऱ्याच्या आणि कुर्त्यांच्या वजनाबरोबरच त्याच्या किंमतही कमी ठेवण्यात व्यापाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे, ५०० ते हजार रुपयांपर्यंत असे खिशाला परवडणाऱ्या किंमतीबरोबरच अडीच ते तीन हजार रुपयांचे भारी घागडो अशी विविधता पाहायला मिळते. ही वैविध्यत्या पुरुषांच्या गोंडेदार पगडय़ा, पारंपरिक दागिने, दांडिया, लहान मुलांचे कुर्ते यांमध्येही आहे. दागिन्यांचा साजही ५० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे. काही मुली वेस्टर्न लूक असलेले दागिनेही सध्या चणियाचोळीवर घालू लागल्या आहेत. पण, सर्वाधिक मागणी आहे ती पारंपरिक दागिन्यांनाच. हातात घालण्यासाठी लाल, पिवळ्या, निळ्या लाकडी बांगडय़ांमध्ये पितळी रंगाच्या धातूच्या बांगडय़ा अधेमधे भरून तयार केलेल्या रंगीबेरंगी चुडय़ाला यंदा तरूणींकडून चांगली मागणी आहे. बांगडय़ा नको असतील तर हातात घालण्यासाठी मोठय़ा कडय़ांचा पर्याय आहेच. या शिवाय घागराचोळीवर शोभेल असे कमरपट्टे, छल्ले, बिंदी, कलाकुसर केलेले रंगीबेरंगी बटवे, टिपऱ्या असे जितके घेऊ तितके कमी अशा वस्तू बाजारात गेल्यानंतर पाहायला मिळतील.