सहजसुंदर अभिनय, सामान्य प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं कथानक आणि नीटस दिग्दर्शन यामुळे ‘एकुलती एक’ चांगलाच जमला आहे. हा चित्रपट बघताना रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी श्रीया पिळगांवकर ही कमाल तयारीची अभिनेत्री असल्याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही..

पन्नास वर्षांपूर्वी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच दिसलेल्या सचिन पिळगांवकर यांना गेल्या पन्नास वर्षांत या एकल्या मार्गावर अनेक साथीदार लाभले. अनेक गोष्टी आत्मसात करत, चुकांमधून शिकत आणि मुख्य म्हणजे रसिक प्रेक्षकांच्या प्रेमावर विश्वास ठेवत त्यांनी केलेल्या वाटचालीचं संचित त्यांच्या नव्या ‘एकुलती एक’ या चित्रपटात पूर्णपणे दिसतं. स्वत:च्या मुलीला ‘लॉन्च’ करण्यासाठी काढलेल्या या चित्रपटात दिग्दर्शक, पटकथाकार म्हणूनही सचिन यांनी श्रीयाच्या भूमिकेला अवास्तव भाव दिलेला नाही. त्यामुळेच हा चित्रपट पाहताना कुठेही कोणत्याही पात्राचं उदात्तीकरण न झाल्याचं लक्षात येतं.

अरुण देशपांडे (सचिन पिळगांवकर) या चित्रपटसृष्टीत प्रचंड नाव कमावलेल्या ख्यातनाम गायकाच्या घरी एक दिवस स्वरा (श्रीया पिळगांवकर) नावाची मुलगी अचानक नागपूरहून बाडबिस्तरा घेऊन आपल्या आईला सोडून येते. १८ वर्षांपूर्वी कुटुंबाला सोडून आलेल्या अरुण यांना आपण तुमचीच मुलगी असल्याची खात्री पटवून देत ती चक्क त्यांच्या घरात डेरेदाखल होते. अरुण देशपांडे यांचे सेक्रेटरी मेहता (अशोक सराफ) यांच्यासह अरुण देशपांडे यांनाही ती आपलंसं करते. वडिलांच्या अनेक गोष्टी, अनेक सवयी बदलते. आपल्या अस्तित्वाने घर भारून टाकते आणि वडिलांनी पूर्णपणे आपलंसं केल्यानंतर अचानक घरातून निघून जाते. स्वरा नेमकी कशासाठी आलेली असते, ती अचानक निघून का जाते, तिचे आईवडील (सचिन आणि सुप्रिया) पुढे एकत्र येतात का, वगैरे प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘एकुलती एक’ पाहायलाच हवा.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद खूपच चांगले बांधलेले आहेत. मात्र कथेतील किशोरी शहाणे यांचे पात्र आणि त्या पात्राची गरज कळत नाही. त्या पात्राला टोकच दिलेले नाही. सेक्रेटरी मेहताचं पात्र मस्त उतरलं आहे. सर्व कथा स्वराभोवती फिरत असूनही अरुण देशपांडे यांनाही खूपच चांगला वाव मिळाला आहे. जुनं आणि नवं यातील झगडा, जुन्या लोकांचा नवीन काही आत्मसात करण्याबाबतचा आकस, एकाच पालकाने वाढवलेल्या मुलांच्या समस्या, करिअर की कुटुंब अशा अनेक गोष्टींचा परामर्श या कथेत घेण्याचा यशस्वी प्रयत्न सचिन पिळगांवकर यांनी केला आहे. या सगळ्याच समस्या कथेच्या प्रवाहात खूपच सुंदर पद्धतीने समोर येतात आणि विचार करायला लावतात.

दिग्दर्शनाच्या बाबतीतही दिग्दर्शकाने हा चित्रपट खूप काळजीपूर्वक हाताळला आहे. अरुण देशपांडेच्या एकटेपणाची सवय, त्याला असलेली शांततेची आवड वगैरे गोष्टी नेपथ्याचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने दाखवल्या आहेत. बदल आणि अथांगता यांच्याबाबत बोलताना समुद्राची पाश्र्वभूमी, आकाशवाणीवरची मुलाखत, फराळाचा डबा वगैरे गोष्टी खूपच सूचक आहेत. त्याबाबत दिग्दर्शकाला शंभरपैकी शंभर मार्क द्यायला हवेत. चित्रपट खूप चांगला संकलित झाल्याने बघताना नक्कीच एकसंधता वाटते. जितेंद्र कुलकर्णीने संगीतबद्ध केलेली गाणी एकाच वेळी यूथफुल आणि अभिजात वाटतात. सोनू निगम, सचिन पिळगांवकर आणि योगिता गोडबोले-पाठक या तिघांनीही ही गाणी उत्तम सादर केली आहेत. छायालेखनाच्या बाबतीतही राहुल जाधव यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.

अभिनयाच्या पातळीवर पदार्पण करणाऱ्या श्रीया पिळगांवकरला शंभरपैकी दोनशे गुण द्यायला हवेत. मस्तीखोर, भावनिक, रोमँटिक अशा सगळ्या छटा असलेलं स्वराचं पात्र तिने खूप हिकमतीनं साकारलं आहे. रोमँटिक दृश्यात तर तिने कमालीची समज दाखवली आहे. श्रीयाखालोखाल अशोक सराफ यांनी साकारलेला गुजराती मेहता मस्तच आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांच्यासाठी नवीन नाही. पण तरीही या भूमिकेत त्यांनी आपल्यातील काहीतरी खास ओतले आहे. सचिन पिळगांवकर यांनीही हेकेखोर तरीही प्रेमळ बाप खूप चांगला रंगवला आहे. पण संवादांची फेक करताना कधीकधी ते कर्कश वाटतात. तरीही त्यांनी अभिनय चांगला केला आहे. इतर कलाकारांमध्ये सुप्रिया पिळगांवकर, किशोरी शहाणे आणि विनय येडेकर यांनीही चांगल्या भूमिका केल्या आहेत. स्वराचा मित्र रंगविलेल्या सिद्धार्थ मेनननेही चांगलं काम केलं आहे.

‘एकुलती एक’

कथा आणि दिग्दर्शन – सचिन पिळगांवकर, पटकथा – सचिन पिळगांवकर आणि क्षितिज झारापकर, संवाद – इरावती कर्णिक, छायांकन – राहुल जाधव, संगीत – जितेंद्र कुलकर्णी, कलाकार – सचिन पिळगांवकर, श्रीया पिळगांवकर, अशोक सराफ, किशोरी शहाणे, सिद्धार्थ मेनन, सुप्रिया पिळगांवकर, विनय येडेकर आणि इतर.

     

Story img Loader