अभिनयाचा प्रवास चांगला यशस्वीरीत्या सुरू असताना दिग्दर्शनाकडे का वळावेसे वाटले?
अभिनय करताना अनेकदा आपल्या वाटय़ाला आलेली व्यक्तिरेखा साकारताना हव्या त्या पद्धतीने साकारता येत नाही असे कधीकधी जाणवते. त्याचबरोबर विषय काही काळापासून घोळत होता. त्या विषयाला मीच न्याय देऊ शकेन असे वाटले म्हणून दिग्दर्शनाकडे वळले.
चित्रपटाचा विषय कसा सुचला?
गेली अनेक वर्षे स्त्रीविषयक मासिकांचे संपादनाचे काम करीत होते. त्यामुळे महिलांशी संबंधित अनेक गोष्टी, अनेक समस्या, अनेक कौटुंबिक समस्या, कुटुंबसंस्था, पती-पत्नीचा संसार याविषयी वाचन-लेखन करीत होते. त्याचबरोबर टीव्हीवरच्या मालिकांमध्ये करीत असलेल्या भूमिका, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, घटस्फोट, नवरा-बायको, आजी-आजोबांशी असलेले नातवंडांचे नाते एकुणातच नातेसंबंध यामध्ये निर्माण होत असलेला दुरावा, करिअर घडविण्यासाठी महिलांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी, कुटुंबापासून लांब राहणे वगैरे गोष्टी मालिकांतून दाखविल्या जात आहेत. त्यापैकी काही भूमिका मीसुद्धा केल्या आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एक संस्कृत सुभाषित वडिलांकडून ऐकले होते. त्याचा अर्थ असा होता की, लग्नाच्या वेळी मुलगी रूप बघून मुलगा पसंत करते, मुलीची आई सांपत्तिक स्थिती पाहते, वडील त्याचे ज्ञान बघतात, नातेवाईक कुळाचा विचार करतात, तर लग्नाला आलेल्या बाकी सगळ्या लोकांना फक्त जेवणामध्ये रस असतो. या सुभाषितावरून लग्नसंस्थेकडे पाहण्याचा प्रत्येक घटकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो हे लक्षात आले. दरम्यानच्या काळात प्रेम, नातेसंबंध, जवळच्या नात्यातील गुंतागुंत यासंबंधीची कथा मनात घोळत होती. म्हणून या विषयावर सिनेमा करायचे ठरविले.
चित्रपटाविषयी आणखी काय सांगशील?
नातेसंबंध, नाती जपायला हवीत ही जाणीव, सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये राहणारे आपण सगळे करिअरला वेळ देताना स्वकेंद्री बनतोय. त्याचा नात्यावर होणारा परिणाम, मोबाइल, फेसबुक, ट्विटरच्या वापरामुळे पटकन ‘रिअॅक्ट’ होण्याची सवय लागते, लहान मुलांवर टीव्ही मालिकांचा परिणाम होतोय, मालिकांमधील अतिरंजित व्यक्तिरेखांमुळे त्यांच्या मनावर त्याचे मोठेपणी काय परिणाम होतील याचीही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. हे सगळे टिपण्याचा आणि हळुवार पद्धतीने मांडणारा असे अनेक कोन दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे.
दिग्दर्शन करायचे ठरविल्यावर तयारी कशा प्रकारे केली?
नेहमी कॅमेऱ्यासमोर काम करण्याची सवय होती. त्यामुळे कॅमेऱ्यामागे काय आणि कसे काम करतात याची माहिती घेऊन अभ्यास करायचे सर्वात आधी ठरविले. चित्रपटाच्या सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन त्याचा प्रभावी पद्धतीने वापर करता यावा, त्यासाठी चित्रपट बनविण्याआधीच्या आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या तसेच पोस्ट प्रॉडक्शनमधील सर्व तांत्रिक बाजूंचा अभ्यास केला. त्यासाठी समीरण वाळवेकर यांनी खूप मदत केली. फिल्ममेकिंगची प्रात्यक्षिक असलेली डीव्हीडी त्यांनी दिली आणि मी फिल्ममेकिंगचा एक अभ्यासक्रम एक महिनाभर शिकले. एवढेच नव्हे तर छायालेखक अमलेंदू चौधरी यांच्यासोबत काही वेळा त्यांना साहाय्यक म्हणून कॅमेऱ्यामागे काम केले. या दोन्हीचा खूप उपयोग झाला. अगदी डबिंगपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये रस घेऊन कोणतीही गोष्ट साहाय्यकांवर जबाबदारी न टाकता स्वत: केल्या. हा अनुभव खूप एन्जॉय केला आणि माझ्या मनातली गोष्ट रुपेरी पडद्यावर साकारली.
माहेरचा साहित्यिक वारसा अणि सासरचा चित्रपट वारसा याचा उपयोग झाला का?
लहानपणापासून आजोबा गोनिदा आणि प्राध्यापक आई-बाबा यांच्यामुळे वाचनाची गोडी लागली. वाचनाने प्रगल्भता येत गेली. सासरे जयराम कुलकर्णी यांना आपल्या मुलांनी-सुनांनी छंद जोपासावेत असे वाटायचे. ते स्वत: सचिन-महेश यांच्या पठडीतील चित्रपटात काम करीत असले तरी त्यांनी चित्रपट-मालिकांमध्ये मी कोणत्या पद्धतीचे काम करावे याबाबत कधीच बंधन घातले नाही. उलट माझ्या पद्धतीने, मला आवडेल ते काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. मुळात सासर-माहेर दोन्हीकडे चर्चा करून विविध विषयांवर दिलखुलास मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहेच. नवरा वकील असला तरी मुळात आम्ही दोघे थिएटर ग्रुपमध्ये होतो. त्यामुळे कलाविषयक जाणिवांच्या बाबतीत काही समान धागे आमच्यात आहेत. त्यामुळे सासर-माहेर तसेच नवरा यांच्याकडून चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी सर्वतोपरीने सहकार्य आणि पाठिंबा मिळाला. म्हणूनच चित्रपट करू शकले.
पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळालाय?
मुंबईत झालेल्या प्रीमियर खेळानंतर खूप जणांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. पुण्यात ई स्क्वेअरला पहिल्या दिवशीचा पहिला खेळ हाऊसफुल्ल असल्याचा निरोप थिएटरवाल्यांनी दिला. पुण्यातील प्रीमियर सीटीप्राइड कोथरूडमध्ये झाला. त्या वेळी तर एवढी गर्दी झाली की केवळ एक स्क्रीन बुक केला असूनही थिएटरवाल्यांना आणखी एका स्क्रीनची सोय करावी लागली.
चित्रपटाच्या बजेट आणि वितरणाविषयी?
चित्रपटाचे बजेट प्रसिद्धी-प्रमोशन वगळता साधारणपणे अंदाजे १ कोटी ७८ लाख रुपयांच्या आसपास झाले. माझ्या सिनेमाचे निर्माते प्रवीण ठक्कर हे मुळात गुजराती सिनेमाचे वितरक होते. त्याचबरोबर हिंदी सिनेमांच्या वितरणाचाही त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे वितरणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.
अभिनय ते दिग्दर्शन सहजसुंदर प्रवास
‘स्वामी’ मालिकेतील रमा साकारण्यापासून सुरू झालेला सहजसुंदर अभिनयाचा प्रवास प्रगल्भ दिग्दर्शिका बनण्यापर्यंत करणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिच्याशी चित्रपट दिग्दर्शन, विषयाची हाताळणी, फिल्म मेकिंगची तयारी याबाबत केलेल्या गप्पा.

First published on: 21-04-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautyful journey from acting to direction