ब्रेक निकामी झाल्याने नियंत्रण सुटलेल्या एसटी बसने ट्रक व मोटारसायकलला धडक दिली. सुदैवाने यात कुणाचा बळी गेला नाही. ‘काळ आला होता पण..’ या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अमरावती मार्गावरील कॅम्पस चौकात घडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही.
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची बस (एमएच/२०/डी/७९७१) कोंढाळीवरून नागपूरला वेगात येत होती. अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसरासमोरील चौकात बस आली. चौकातून उतार सुरू होत असल्याने चालकाने ब्रेक लावला. ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले आणि तो हादरलाच. त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस वेडीवाकडी वळणे घेऊ लागली. यावेळी वाडीकडे एक ट्रक जात होता. चढावावर आल्यामुळे त्याची गती कमीच होती. बस ट्रककडे वळत असल्याचे दिसल्याने घाबरून चालक बसच्या आत पळाला. वेगात असलेली बस ट्रकवर आदळली. त्यामुळे बसचा चालकाकडील भाग चेपला आणि बस डावीकडे वळली. नेमकी याचवेळी फुटाळा तलावाकडून एक मोटारसायकल (एमएच/३१/सीएफ/५९५३) आली. बस आपल्या बाजूने वळल्याचे दिसताच चालकाने मोटारसायकल सोडून दिली. मोटारसायकल बसच्या डावीकडील समोरच्या चाकाखाली फसली आणि बस थांबली. रविनगरकडून वाडीकडे जात असलेल्या वाहन चालकांनी घाबरून वाहने अंबाझरी तलावाकडे वळविली. समोरच्या घराच्या पायऱ्यांजवळ असलेले लोक बस आपल्या दिशेने येत असल्याचे दिसताच तेथून दूर पळाले. बसमधील प्रवाशांचीही घालमेल झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा