कामगारांमध्ये अस्वस्थता
महापालिकेतील घंटागाडी योजनेंतर्गत काम करणाऱ्या ३४ कामगारांना पनवेलच्या सहकारी संस्थेच्या उपलेखा परीक्षकांकडून २००४ मधील कर्ज प्रकरणांबाबत नोटीस पाठविण्यात आल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
तथाकथित ठेकेदार रामराव पाटील यांनी २००४ मध्ये भविष्यनिर्वाह निधी, विमा यांसाठी त्यांच्या नावे परस्पर नऊ ते १० लाख रुपयांचे वाहन कर्ज, खोटी कागदपत्रे दाखवून काढल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या कर्जवसुलीसाठी २००९-१० मध्ये कामगारांना अंतिम नोटीस देण्यात आली. खोटय़ा कर्जप्रकरणाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात १० जुलै २००९ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात सहकारमित्र चंद्रकांत बढेसर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित वरणगाव, जि. जळगाव, शाखा जुने पनवेल या बँकेतून कोणतेही कर्ज घेतलेले नाही, असे प्रतिज्ञापत्र फिर्याद दाखल करणाऱ्या कामगारांनी ९जुलै २००९ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक परिमंडळ यांच्याकडे दिले.
हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कामगारांना उपलेखानिरीक्षक, सहकारी संस्था, पनवेल यांच्याकडून २८ जानेवारी २०१३ रोजी नोटीस पाठविण्यात आल्याने कामगारांमध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. या नोटिसीत २२ फेब्रुवारी रोजी कामगारांना कर्जाबाबत सुनावणीसाठी पनवेल येथे ११ वाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. कामगार गैरहजर राहिल्यास अर्जाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही बजावण्यात आले असल्याची माहिती नाशिक महापालिका श्रमिक संघाने दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा