बिरसी विमानतळ पुनर्वसन पॅकेज
येथील राष्ट्रवादीचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारने साकारलेला बिरसी विमानतळ हा प्रकल्प  एक महत्वकांक्षी उपक्रम आहे, पण या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज न मिळाल्याने या प्रकल्पावरील बांधकाम थांबवण्याचे निर्देश काँग्रेस नेते व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी प्रशासनाला दिल्याने या जिल्ह्य़ात आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या विमानतळ विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करून तेथे जवळपास ९० टक्के नवीन बांधकाम  पूर्ण झाले असले तरी येथील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज देण्यात भारतीय विमान प्राधिकरणाने टाळाटाळ केल्याने येथील शेतकऱ्यांना शेवटी न्याय्य मागण्यांसाठी विमानतळाच्या मुख्य द्वारासमोर धरणे आंदोलन करून विमानतळ प्रशासनाला विरोध करण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. या प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश शेवटच्या टोकाला पोहोचल्यावर आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन याचे गांभीर्य, राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री पतंगराव कदम यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी या कामावर व भूसंपादनावरही बंदी घालण्याचे निर्देश भारतीय विमान प्राधिकरणाला दिले आहेत. वेळोवेळी विविध व्यासपीठांवरील भाषणातून प्रफुल्ल पटेल या प्रकल्पाची स्तुती करून एखाद्या क्षेत्रात विमानोड्डाण अकादमी स्थापन करणे किंवा विमानतळ प्राधीकरण उभारण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे वर्णने करीत असतात. मी हे आपल्या प्रयत्नांनी गोंदियासारख्या मागासलेल्या क्षेत्रात खेचून आणले आहे, असे ते सांगत असतात, पण आता आंदोलकांना पाठबळ देत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पुनर्वसन मंत्र्यांकरवी प्राधिकरणाचे भूसंपादन व बांधकामावर बंदी घातल्यामुळे पटेलांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण होणार असल्याचे निश्चित आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कांॅग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची कोणतीही संधी सोडत नसतांना कांॅग्रेसच्या आमदारांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील कॉंग्रेसचे मंत्री पटेलांच्या ड्रिम प्रोजेक्टच्या कामात अडथळे निर्माण करीत असतील तर पटेलही चूप बसणार नाही. आज मंगळवारी या संदर्भात कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना प्राधिकरणाचे भूसंपादन व बांधकामावरील बंदीने प्रफुल्ल पटेल नाराज होणार नाही का, असे विचारले असता ते म्हणाले की, पटेल नाराज झाले तरी चालेल, पण आपल्या मतदारसंघातील जनता आपल्यापासून नाराज व्हायला नको. एकीकडे पटेल आणत असलेल्या भेल कंपनीच्या भूसंपादनाकरिता शेतकऱ्यांना ९ लाख रुपये प्रती एकर भाव दिला जात आहे, पण बिरसी येथील शेतकऱ्यांना ४ लाख रुपये देण्यासही प्राधिकारण मागे पुढे पाहत आहे. त्यावरही प्राधिकरणाचे अधिकारी पुनर्वसन व भूसंपादनाकरिता शेतकऱ्यांशी बठका करीत नाही. बठक झालीच तर त्यात हजर राहत नाही. यामुळे स्थानिक आमदाराच्या नात्याने मला ही ताठर भूमिका घ्यावी लागल्याचे ते ‘लोकसत्ता’शी बोलतांना म्हणाले. आज या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र जैन यांना फोन केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेही जिल्ह्य़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसने वेळोवेळी कॉंग्रेसची गोची केल्याची बरीच उदाहरणे आहेत. यामुळेच की काय, गोंदियाला मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवालांनी याबाबतचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये, यासाठी त्यांना वेळही न देता रात्रभरातच संपूर्ण गोंदियासह जिल्ह्य़ात मोठमोठे होìडग्ज लावून आपल्याच प्रयत्नांनी गोंदियाला वैद्यकीय महाविद्यालय मिळाल्याचे सूतोवाच करून दिले होते. या संदर्भात पटेलांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारणा केली असता सांगितले की, या महाविद्यालयाकरिता केंद्रातील वैद्यकीय सल्लागार समितीची शिफारस लागते व ती मिळवून देण्यात जिल्ह्य़ाच्या विकासाकरिता आपलीही  महत्वाची भूमिका आहे. ही बाब जनतेला ठावूक आहे. ती आपण आपल्या तोंडाने बालून दाखविणे बरोबर नाही, असे मत व्यक्त केले होते, पण आता बिरसी  विमान प्राधिकरणाचे भूसंपादन व बांधकामावरील बंदीच्या पुनवर्सन मंत्र्यांचे निर्देशामुळे हे प्रकरण अधिक तापणार व त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे.

Story img Loader