किराणा दुकानदारीत थेट परकीय गुंतवणुक या विषयावर काँग्रेसचा पहिला विभागीय मेळावा अंतर्गत वादाने गाजत आहे. या वादामुळे स्थानिक पदाधिकारी आणि काही नेत्यांना मेळावा रद्द व्हावा, असे वाटत आहे. जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्ष यांची तयारी वेगाने सुरू असली तरी कार्यकर्त्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. अल्पसंख्याक व महिलांना या मेळाव्याच्या नियोजनात स्थान नसल्याने त्यांनी देखील वरिष्ठांकडे  नाराजी व्यक्त केली.
अकोला महापालिकेत काँग्रेसने महाआघाडीला पाठिंबा देत सरकार स्थापन केले. पण, महापालिकेची ढासळलेली आर्थिक स्थिती व कोसळलेले प्रशासन पाहता काँग्रेसबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांनी अकोला शहर दत्तक घेण्याची घोषणा निवडणूकीपुर्वी केली होती पण, तसे झाले नाही. महापालिकेतील स्थितीचा परिणाम या मेळाव्यावर होण्याची चिन्हं आहे. महापालिकेच्या १८ पैकी केवळ तीन नगरसेवक या मेळाव्याच्या तयारीच्या बैठकीत उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी उघडपणे समोर आली. ही नाराजी महानगरअध्यक्ष यांच्याबद्दल असून मेळाव्याबद्दल नसल्याचा खुलासा एका नगरसेवकाने खाजगीत केला.  काँग्रेसचा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी असलेले स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकींना यश आले नाही. हे अपयश लपविण्यासाठी त्यांनी शहरभर होर्डीग लावत मेळाव्यापेक्षा स्वतचा प्रचार सुरू केला. महापालिकेत काँग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक हे अल्पसंख्याक आहेत. पण, मेळाव्यात काँग्रेसने अल्पसंख्याक लोकांना कुठलेही प्रतिनिधीत्व दिले नसल्याची ओरड एका वरिष्ठ अल्पसंख्याक नगरसेवकाने केली. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्यांना या मेळाव्यापासून दूर ठेवले आहे. महिला आघाडीच्या प्रमुखांनी या बाबतची एक तक्रार प्रदेश काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याकडे केली.  जिल्हा काँग्रेस मध्ये देखील एक वाक्यता नसल्याची माहिती मिळाली. तर जिल्हा काँग्रेसच्या बैठकींना देखील अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहे. काँग्रेसचे स्वराज्य भवन या जिल्हा कार्यालय असलेल्या ठिकाणी खाजगी दुकाने थाटल्याने येथील क्रिकेट क्लब मैदानावर हा मेळावा होत आहे. या मेळाव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील क्रिकेट खेळाडूंचा खेळ थांबला. तसेच या मैदानावर ठिकठिकाणी गड्डे केल्याने येथील लाखो रुपये खर्च करुन निर्माण केलेल्या खेळपट्टीला बाधा निर्माण होऊ शकते, असा अंदाज काही खेळाडूंनी व्यक्त केला. या मैदानावर सुमारे वीस हजार लोकांची बसण्याची सुविधा येथे होऊ शकते पण, इतके कार्यकर्ते जमविण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कितपत यश मिळते याकडे पक्षांतर्गत नेत्यांचे लक्ष लागले आहे.      

नियोजनाचे तीन तेरा
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्य़ातून काँग्रेसचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी येणार आहे. या साठी बसेस, जीप व चारचाकी गाडय़ांची मोठी सोय पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. पण, या गाडय़ांच्या पार्किंगची सोय शहरात कुठे ही करण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी येथील वाहतुक व्यवस्था ठप्प पडण्याची चिन्हं आहे. नियोजनात गाडय़ांची पार्किंग व कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या मेळाव्यात गोंधळ होऊ नये, यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.