क्षुल्लक कामांसाठी वारंवार कार्यालयात मारावे लागणारे खेटे, त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे रूढ झालेल्या ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या समजुतीला पूर्णपणे छेद देणारा एक अभिनव उपक्रम ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत असून त्यात केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची त्वरित अंमलबजावणी होऊन किमान ५० हजार मुरबाडकर लाभार्थी ठरतील, असा प्राथमिक अंदाज आहे. मानव विकास निर्देशांकानुसार राज्यातील मागास तालुक्यांच्या यादीत सर्वात तळाशी असणाऱ्या मुरबाडमध्ये शासकीय योजनांचे सर्वाधिक वैयक्तिक लाभार्थी ठरण्याचा विक्रम यानिमित्ताने नोंदविला जाणार आहे.
‘शासकीय योजनांची जत्रा’ म्हणून संबोधला गेलेला अशा प्रकारचा देशातील हा बहुधा पहिलाच उपक्रम असून त्यात लाभार्थीना तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जत्रेचा कालावधी तीन दिवसांचा असला तरी सर्व शासकीय यंत्रणा गेले महिनाभर त्याची पूर्वतयारी करीत आहे. उपक्रमात जास्तीत जास्त रहिवाशांनी सहभागी व्हावे म्हणून अक्षरश: घराघरांत जाऊन लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. मुरबाड एमआयडीसीच्या सभागृहात त्यासाठी ५० स्टॉल्स उभारण्यात आले असून तिथे तिन्ही दिवशी १८ तालुकास्तरीय शासकीय विभाग, विविध बचत गट आणि अशासकीय संस्था सहभागी होत आहेत. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या शासकीय योजनांच्या जत्रेत प्रामुख्याने तालुक्यातील आम आदमी विमा लाभार्थीच्या किमान दहा हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना दाखले, ३०० बचत गटांना विविध वित्तीय संस्थांमार्फत दोन ते तीन कोटी रुपयांचे अर्थसहाय्य, मानव विकास अभियानाअंतर्गत पाचवी ते नववीच्या ७२८ विद्यार्थिनींना सायकली देण्यात येणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पेन्शन योजना लाभार्थी नोंदणी, आधार कार्ड नोंदणी, तसेच विविध शैक्षणिक दाखले वितरित केले जाणार आहेत.
या जत्रेच्या ठिकाणी महसूल अदालत भरवून विविध प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृषी विभागामार्फत आरपीएफची फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा मागविण्यात आली असून त्याद्वारे दररोज किमान एक हजार माती नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे या जत्रेत शिकाऊ परवाना शिबीर भरविण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने जत्रेत हॉटेल्स, किराणा दुकाने, रेशन दुकाने हातगाडीवाले तसेच अन्न व प्रक्रिया उद्योगाची नोंदणी करण्यात येईल. तसेच विद्युत वितरण कंपनीतर्फे घरगुती वीज जोडणी, औद्योगिक वीज जोडणी व शेती पंप वीज जोडणीसाठी अर्ज स्वीकारून दुसऱ्या दिवशी वीज जोडणी केली जाईल. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमीन मोजणीचे अर्ज तात्काळ घेऊन नागरिकांना मोजणीची तारीख, वेळ व संबंधित कर्मचाऱ्याचा नंबर देण्यात येईल. अशा प्रकारे विविध प्रकारच्या तब्बल ११० योजना जास्तीत जास्त लाभार्थीपर्यंत नेण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा करीत आहे.
शासकीय योजनांच्या जत्रेत लाभार्थीचा विक्रम?
क्षुल्लक कामांसाठी वारंवार कार्यालयात मारावे लागणारे खेटे, त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे रूढ झालेल्या ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या समजुतीला पूर्णपणे छेद देणारा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2014 at 01:19 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beneficials of government schemes