निधीअभावी जि. प. च्या लघु पाटबंधारे विभागास सिंचनाच्या एकाही प्रकल्पाचे काम हाती घेता आले नाही. यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी जि. प. अध्यक्षा आशाताई भुतेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे.
जि. प. सिंचन विभागास २०० नवीन सिमेंट बंधारे बांधण्यास २५ कोटींच्या निधीची गरज आहे. पाझर तलाव, तसेच कोल्हापूर बंधाऱ्यांचाही यात अंतर्भाव आहे. निधी उपलब्ध झाल्यास सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी कामे करता येऊ शकतील. जिल्ह्य़ातील सिंचनक्षेत्र, भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासाठी हे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जि. प. आरोग्य विभागात द्वितीय श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे मंजूर असली, तरी यातील २२ पदे रिक्त आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पाणीयोजनांवर केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के तरतूद करते. २०१३-१४ या वर्षांत जालना जिल्ह्य़ाचा या योजनेचा केंद्राचा हिस्सा मागणी करूनही मिळाला नाही. त्यामुळे नळ पाणीयोजनांची कामे अपूर्ण आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भातही काही निर्णय सरकारने घेण्याची गरज आहे. मातीनाला, सिमेंटनाला बांध ही कामे ग्रामपंचायतीमार्फत घेण्यास परवानगी आवश्यक आहे. शिरपूर बंधाऱ्यांची कामेही या योजनेतून ग्रामपंचायतींमार्फत होणे गरजेचे आहे. या योजनेसाठी प्रशासकीय खर्चाचे प्रमाण वाढवावे, तसेच स्वतंत्र तांत्रिक मनुष्यबळ द्यावे, अशी मागणीही भुतेकर यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा