नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर जुन्याची सद्दी संपते आणि नव्या-जुन्यात एक संघर्ष सुरू होतो, हा प्रकार आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाला असला, तरी मुंबईत मात्र नवे-जुने एकमेकांची भरभराट करताना दिसत आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो-१मुळे बेस्टच्या काही मार्गावरील बसगाडय़ांना फटका बसला होता. मात्र आता पुन्हा या मार्गानी जोर धरला असून या मार्गावरील बसगाडय़ा क्षमतेएवढय़ाच भरून जात आहेत. घाटकोपर-अंधेरी यादरम्यान चालणारी ३४० क्रमांकाची बस पुन्हा जोमाने धावू लागली आहे. विशेष म्हणजे यात मेट्रोचे वाढलेले तिकीट दरही कारणीभूत आहेत.
जून महिन्यात सुरू झालेली मेट्रोची सेवा मुंबईकरांच्या पसंतीला उतरली. सुरुवातीला १० रुपयांचे स्वागतमूल्य असल्याने मुंबईकरांनी मेट्रोची सफर करायला गर्दी केली. हळूहळू मेट्रोच्या नियमित प्रवाशांची संख्या वाढली. यादरम्यान, घाटकोपर स्थानक पश्चिम ते अंधेरी स्थानक पूर्व आगरकर चौक यादरम्यान धावणारी बेस्टची ३४० क्रमांकाची सेवा ओस पडली होती. त्यामुळे बेस्टने या मार्गावरील आपल्या बसगाडय़ांचा ताफाही ३० वरून २० वर आणला होता. मेट्रोच्या वाढत्या प्रतिसादामुळे बेस्टचे हे मार्ग तोटय़ात चालल्याचेही दिसत होते.मात्र मेट्रोच्या तिकिटाचे सवलत मूल्य १० रुपयांवरून वाढवून १०-२० आणि ३० रुपये केल्यानंतर प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. मेट्रोच्या तुलनेत अंधेरीपर्यंत बेस्टचे तिकीट १५-१६ रुपयेच असल्याने प्रवाशांना ते परवडते. हे प्रवासी पुन्हा बेस्टकडे वळले असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले. मेट्रो सेवेचा फटका रिक्षाचालकांना नक्कीच बसला. सुरुवातीला आम्हालाही तोटा सहन करावा लागला. मात्र दोन महिन्यांतच आमची ३४० क्रमांकाची बस भरभरून जाऊ लागली. त्यामुळे आम्ही आता या मार्गावर पुन्हा ३० बसगाडय़ा चालवण्यास सुरुवात केली आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.दरम्यान, खासगी गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी मेट्रोचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच मेट्रोमुळे रिक्षा वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाल्याने साकीनाका, असल्फा येथील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी सुटली आहे. त्यामुळे बसगाडय़ा घाटकोपर किंवा अंधेरी येथे पोहोचण्यास लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्याचा फायदाही बेस्टचे प्रवासी वाढण्यासाठी झाला आहे. बेस्ट आणि मेट्रो यांनी एकमेकांना पूरक काम केल्यास ते मुंबईकरांसाठी सोयीचे ठरेल, हेच यातून सिद्ध झाल्याचे गुप्ता यांनी सांगितले.