स्थानिक नगरसेवकांची मागणी आहे, म्हणून एखाद्या ठिकाणी बस सुरू करायची. मात्र त्या बसच्या वेळा तेथील स्थानिकांच्या सोयीच्या दृष्टीने न ठेवता बेस्ट प्रशासनाच्या दृष्टीने ठेवायच्या. मग त्या बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे करत महिन्या-दोन महिन्यांत ती सेवा बंद करायची, असे प्रकार बेस्टमध्ये वारंवार घडत आहेत. बेस्ट प्रशासनाने दहा ते पंधरा बसमार्ग बंद करताना नेमके हेच कारण दिले आहे. मात्र प्रत्यक्षात या बसगाडय़ा तोटय़ात चालण्यामागे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता हे महत्त्वाचे कारण असल्याचा आरोप होत आहे.
बेस्टने गेल्या काही महिन्यांत आठ बसमार्ग बंद केले, तर अनेक मार्गाचे प्रवर्तनही मध्येच खंडित केले. त्यातील काही बसमार्ग हे स्थानिक नगरसेवक अथवा बेस्ट समिती सदस्य यांनी केलेल्या मागणीनंतर सुरू झाले होते. एखादा बसमार्ग सुरू करताना बेस्ट प्रशासन त्या मार्गावरील प्रवासी संख्येचा अभ्यास करते. त्यानंतरच त्या मार्गाला हिरवा कंदील मिळतो. मात्र यापैकी ‘मिल्लत नगर-हुतात्मा चौक’ या मार्गावर बेस्टने बस सुरू केली होती. या भागातून ही बस सकाळी ८ आणि ११ वाजता निघत होती. मात्र या भागातील प्रवासी सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत या मार्गाने प्रवास करतात. परिणामी या मार्गावर प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत हा मार्ग बेस्टने बंद केला.
या मार्गाप्रमाणेच अंधेरी ते शिवाजी पार्क या मार्गावरील गाडीही बेस्ट प्रशासनाने अपुऱ्या प्रवासी संख्येचे कारण देऊन आधी माहीम, नंतर वांद्रे आणि आता सांताक्रूझपर्यंत चालवण्याचा निर्णय बेस्टने घेतला. ही बस ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीची होती. मात्र ती बस सकाळी सातच्या सुमारास चालवत असल्याने त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
बेस्ट प्रशासनाच्या या भूमिकेवर समिती सदस्यांनी टीकेची झोड उठवली. बेस्टच्या परिवहन विभागाचे अधिकारी नेमके काय काम करतात, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. बेंगळुरू शहरातील परिवहन व्यवस्था आणि बेस्टची व्यवस्था यांची तुलना केल्यास बेंगळुरूमध्ये दर दिवशी प्रत्येक बस मुंबईपेक्षा जास्त किलोमीटर धावते. बेंगळुरूमध्ये एक बस दर दिवशी २२१ किलोमीटर धावते. तर मुंबईत हे प्रमाण १९१.३ किमी आहे. तर एक किलोमीटर धावण्यासाठी बेंगळुरूमधील बसला ४८.३६ रुपये एवढा खर्च येतो. मुंबईत हा खर्च ८७.५२ रुपये एवढा प्रचंड आहे. बेंगळुरूमध्ये परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३६,७१३ एवढी असून मुंबईत बेस्टच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३६,१८४ एवढी आहे.
दोन्ही शहरांमधील परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या संख्येत फार फरक नसूनही मुंबईतील बेस्ट तोटय़ात आहे, मात्र बेंगळुरूच्या बसगाडय़ा नफा कमावतात. बेस्टमधील तोटय़ासाठी नेहमी चालक-वाहक यांनाच जबाबदार धरले जाते. मात्र अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी टाकली जात नाही. ही जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी, असे बेस्ट समितीतील काँग्रेसचे सदस्य शिवजी सिंह यांनी स्पष्ट केले.
तर अधिकारीवर्गाला बेस्टच्या आर्थिक स्थितीशी काहीच देणेघेणे नसून बेस्ट तोटय़ात चालत असताना त्यांचे पगार वाढतच आहेत. त्यांना या सर्व तोटय़ासाठी जबाबदार धरायला हवे. त्यांच्याकडून प्रशासनाने कामे करून घ्यायला हवीत, असे मत सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केले. अधिकाऱ्यांची दोन दिवसांची साप्ताहिक सुटी रद्द करून त्यांनी एक दिवस रस्त्यावर उतरून वाहतुकीच्या स्थितीबाबत अभ्यास करायला हवा. त्यांनी आगारांना भेटी देऊन समस्या जाणून घ्यायला हव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बेस्टच्या तोटय़ाला अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा, नियोजनशून्यता जबाबदार आहे का, याबाबत प्रशासन नक्कीच चौकशी करेल. तसेच प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना सूचना देऊन अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिले.