वीज बिल भरणा केंद्रांवर असलेल्या रांगांचा विचार करून ‘बेस्ट’ने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचे ठरवले असले, तरी तशा आशयाचे फलक येथे लावले जात नाहीत. त्यामुळे रांगेत पुढे जाऊ पाहणारे ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य ग्राहक यांच्यातील भांडणे ‘बेस्ट’च्या वीज बिल भरणा केंद्रांवर नित्य अनुभवास येतात. हे लाकडी फलक बनवण्यासाठी वीज पुरवठा विभागाने ‘स्थापत्य अभियांत्रिकी विभागा’कडे विचारणा केली होती. मात्र गेले अनेक दिवस हे काम प्रलंबित असल्याने वीज बिल भरणा केंद्रावरची भांडणे नित्याची झाली आहेत.
वीज बिल अथवा टेलिफोन बिल भरण्याचे काम सामान्यपणे घरातील ज्येष्ठ नागरिक करतात. ज्येष्ठ नागरिकांना बिल भरण्यासाठी रांगेत फार काळ उभे राहावे लागू नये, यासाठी या बिल भरणा केंद्रांवर त्यांना प्राधान्यही देण्यात येते. ‘बेस्ट’ची वीज बिल भरणा केंद्रेही याला अपवाद नाहीत. मात्र या बिल भरणा केंद्रांवर ‘ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य’ अशा आशयाचा कोणताही फलक लावलेला नसल्याने अनेकदा सामान्य ग्राहक व ज्येष्ठ नागरिक यांच्यात वादावादी होते. ही वादावादी टाळण्यासाठी ‘बेस्ट’ने येथे काही वेळा कागदी फलकही लावले. मात्र हे कागदी फलक फाडून टाकल्याचे आढळले.
ही समस्या कायमची मिटवण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रांवर लाकडी फलक लावण्यात यावेत, असे वीजपुरवठा विभागाने सुचवले. त्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागालाही सूचना देण्यात आल्या. मात्र हे काम प्रलंबित असल्याने असे फलक अद्याप तरी बनले नसल्याचे बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत ‘बेस्ट’च्या जनसंपर्क विभागाकडे विचारणा केली असता, लाकडी फलक तयार करण्याच्या सूचना स्थापत्य विभागाला देण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडे एकाच वेळी अनेक कामे असतात. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी फायद्याच्या या कामाला प्राधान्य दिले जाईल, असे ‘बेस्ट’चे जनसंपर्क अधिकारी ज्ञानदेव खरात यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा