शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत, तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात उत्तम शिक्षण देणे शक्य झाले आहे, मात्र त्यासाठी मनापासून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.
डॉ. निमसे यांची लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी व अखिल भारतीय विज्ञान परिषदेवर निवड झाल्याबद्दल भोरवाडी (ता. नगर) येथे कै. विठ्ठलराव भोर गुरुजी मातृग्राम प्रतिष्ठान व भोरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. निमसे हे भोरवाडीचे जावई आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले होते.
भोर गुरुजींचे स्वप्न साकार करण्यासाठी गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन करून निमसे म्हणाले की, शिक्षक व अधिका-यांनी ठरवले तर युवा शक्तीचा योग्य वापर होईल व भारत महासत्ता होईल, इतर क्षेत्राप्रमाणेच शिक्षण क्षेत्राचेही मूल्यमापन होण्याची गरज आहे.
कार्ले यांनी भोर गुरुजींचा आदर्श ठेवून ग्रामविकास करण्याची व उत्तम दर्जाचे ग्रामपंचायत कार्यालय उभारण्याची ग्वाही दिली. अॅड. सुभाष भोर यांनी भोर गुरुजींच्या कार्याची माहिती दिली. गुरुजींच्या इच्छेनुसार दोन गुंठे जागा ग्रामपंचायत कार्यालयासाठी देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. डॉ. निमसे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय व रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी सरपंच विठ्ठल जासू, प्राचार्य खासेराव शितोळे, उद्योजक बी. टी. काकणे, वसंत ठोकळ, सुलभा निमसे, जयश्री देसले, अरुणा खांडगे, उज्ज्वला बनकर, गिरिबा कदम, अनिल बनकर, रमेश नागवडे, काका शेजूळ, संजय गायकवाड आदी उपस्थित होते. रामदास भोर यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी भोर यांनी आभार मानले.
तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात उत्तम शिक्षण शक्य
शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत, तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात उत्तम शिक्षण देणे शक्य झाले आहे, मात्र त्यासाठी मनापासून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.
First published on: 11-06-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best education is possible in low cost due to technology