जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत अव्वल शहरांमध्ये स्थान पटकावलेल्या मुंबईत बेस्टची वीज वापरणारे ग्राहक मात्र या स्थानाला धक्का पोहोचवत आहेत. मीटरमध्ये फेरफार करणे, मीटरशिवायच वीज जोडणे, वीजेची लाइन अनधिकृतपणे वाढवणे अशा चौर्यकर्मामुळे ‘बेस्ट’चा महसूल बुडवण्याचे काम मुंबईकर करत आहेत. मात्र बेस्टच्या भरारी पथकांनी गेल्या दोन वर्षांत वीजचोरीविरोधात कणखर मोहीम राबवून १४ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे समोर आले आहे. मुंबईत सुमारे १० लाख ग्राहकांना बेस्टचा वीजपुरवठा होतो. इतर वीज पुरवठादारांच्या तुलनेत बेस्टचे वीजदर कमी आहेत. स्वस्त दराने वीज पुरवठा करूनही बेस्टच्या ग्राहकांमध्ये चौर्यकर्म करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. बेस्टची भरारी पथके ही वीजचोरी रोखण्यासाठी सातत्याने छापे घालत असतात. २०११-१२ आणि २०१२-१३ या कालावधीत बेस्टच्या या ‘जागरूकता विभागा’ने शहरात घातलेल्या छाप्यांमध्ये सुमारे १४ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. मीटरमध्ये फेरफार करण्याच्या घटना २०११-१२ या वर्षांत १०२९ होत्या. मात्र या विभागाच्या धडाडीमुळे १२-१३ या वर्षांत या घटनांची संख्या २४० वर खाली आली. बेस्टने वसूल केलेल्या दंडाची रक्कमही याच घटनांमध्ये सर्वात जास्त आहे. ११-१२ या वर्षांत बेस्टने अशा घटनांमधून साडेपाच कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता, तर पुढील वर्षांत ही रक्कम चार कोटी ८० लाख एवढी होती. त्याशिवाय बेस्टला मीटरशिवाय वीज जोडणी करणारे आणि अनधिकृतपणे वीजेची लाइन वाढवून घेणारे, अशा वीजचोरांशीही सामना करावा लागत आहे. या घटनांमध्ये घट व्हावी, यासाठी बेस्ट पुढील काळात जागरूकता अभियान हाती घेणार असल्याची माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली. अत्यंत अल्प दरांत वीजपुरवठा होऊनही अशा प्रकारे वीजचोरी होणे योग्य नाही. ही वीजचोरी रोखण्यासाठी आगामी काळात जागरूकता विभागही कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बेस्टच्या वीजचोरीचा टक्का वाढला
जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत अव्वल शहरांमध्ये स्थान पटकावलेल्या मुंबईत बेस्टची वीज वापरणारे ग्राहक मात्र या स्थानाला धक्का पोहोचवत आहेत.
First published on: 07-03-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best electricity theft increases