‘बेस्ट’च्या परिवहन विभागात बसवाहक म्हणून रुजू झाल्यानंतर आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर पदोन्नती मिळवून अभिलेखक पदावर पोहोचलेल्या एका कर्मचाऱ्याला ‘पदवी वेतनवाढ’ मिळविण्यासाठी निवृत्त झाल्यानंतरही झगडावे लागत आहे. औद्योगिक न्यायालयाने आदेश दिल्यामुळे काही महिने ‘पदवी वेतनवाढ’ पदरात पडली खरी; पण सर्वोच्च न्यायालयात धाव घेत बेस्ट प्रशासनाने ती पुन्हा रोखली. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतरही प्रशासन ‘पदवी वेतनवाढ’ देण्यास तयार नसल्याने या कर्मचाऱ्याची लढाई सुरूच आहे.
विक्रोळी येथील शामराव कदम ३० मार्च १९७८ रोजी बसवाहक म्हणून ‘बेस्ट’मध्ये लागले. नोकरी करतानाच त्यांनी पदवी आणि पदवीत्तर शिक्षणही पूर्ण केले. त्यामुळे १९९१ मध्ये अभिलेखकपदी त्यांना बढती मिळाली आणि त्यांना ‘एजी-५’ वेतनश्रेणी लागू झाली. ‘एजी-५’ वेतनश्रेणीत गेल्यानंतर ‘पदवी वेतनवाढी’पोटी मिळणाऱ्या चार वेतनवाढीसाठी त्यांनी अर्ज केला. परंतु या वेतनश्रेणीत येण्यापूर्वीच पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांना वेतनवाढ नाकारण्यात आली. ही वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्याला ‘पदवी वेतनश्रेणी’ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले. यावर कदम यांनी या अन्यायाविरुद्ध औद्योगिक न्यायालयात धाव घेऊन आपली कैफियत मांडली. औद्योगिक न्यायालयाने १९९४ मध्ये तात्पुरता आदेश देऊन चार वेतनवाढी देण्याचा आदेश ‘बेस्ट’ला दिला. त्यानुसार त्यांना वेतनवाढ मिळूही लागली. औद्योगिक न्यायालयाने १९९६ मध्ये अंतिम आदेश देऊन चार वेतनवाढी देण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यावर ‘बेस्ट’ प्रशासनाने उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश मिळविला आणि वेतनवाढ बंद केली.
परंतु काही दिवसांतच उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे शामराव कदम यांनी प्रशासनाला पत्र पाठवून या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली. संबंधित सर्वच विभागांमध्ये स्मरणपत्र पाठवून वेतनवाढ आणि थकबाकी मिळावी यासाठी विनंती केली. प्रत्येक विभागाने महाव्यवस्थापकांची भेट घेण्याचा सल्ला त्यांना दिला. अखेर २०१४ मध्ये शामराव कदम निवृत्त झाले आणि अखेपर्यंत महाव्यवस्थापकांची भेट काही होऊ शकली नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे ते निराश झाले. मात्र निवृत्तीनंतरही आपला लढा त्यांनी सुरूच ठेवला आहे. ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर आणि समिती सदस्यांना त्यांनी विनंती पत्र पाठविले आहे. निवृत्तीनंतर तरी आपल्याला हे पैसे मिळावेत, असे आर्जव त्यांनी पत्रामध्ये केले आहे. पदोन्नती मिळवून ‘एजी-५’ वेतनश्रेणी मिळवलेले आणखी अनेक कर्मचारी अद्याप चार वेतनवाढीपासून वंचित राहिले आहेत. कदम यांच्या लढाईमुळे त्यांनाही ‘पदवी वेतनवाढ’ मिळण्यातील अडसर दूर होऊ शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा