आर्थिक डोलारा सावरण्यासाठी धडपडत असलेल्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील वातानुकूलित बसगाडय़ा आतबट्टय़ाच्या ठरल्या आहेत. परिणामी येत्या दोन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने ही सेवाच बंद करण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले आहे.
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्टची बस सेवा तोटय़ामुळे पंक्चर झाली आहे. वाहतूक विभागाच्या तोटय़ाचा भार हलका करण्यासाठी विद्युतपुरवठा विभागाला मिळणाऱ्या नफ्याची रसद पुरविली जात आहे. मात्र त्यामुळे बेस्टच्या एकूणच आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून तोटा अधिकच वाढू लागला आहे. तोटय़ाचा भार सहन न झाल्यामुळे बेस्ट उपक्रम डबघाईला येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
वाहतूक विभागाच्या तोटय़ात वातानुकूलित बसमुळे अधिकच भर पडली आहे. या बसगाडय़ांवरील खर्चाच्या तुलनेत बेस्टला निम्मेही उत्पन्न मिळत नाही. काही बसगाडय़ा जुन्या झाल्यामुळे त्यावरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने या बसगाडय़ा तोटय़ात धावत आहेत. या पाश्र्वभूमीवर आर्थिक ताण वाढविणाऱ्या या वातानुकूलीत बसगाडय़ांचे आयुर्मान विचारात घेऊन त्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णयाप्रत बेस्ट उपक्रम आला आहे. आताच वातानुकूलित सेवा बंद केली तर बसेस कुठे उभ्या करायच्या, असा प्रश्न बेस्टपुढे पडला आहे. त्यामुळे बसगाडय़ांचे आयुर्मान संपेपर्यंत त्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन वर्षांत या बसगाडय़ांचे आयुर्मान पूर्ण होईल आणि त्या भंगारात काढण्यायोग्य होतील. त्यानंतर वातानुकूलीत सेवा पूर्णपणे बंद होईल, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा