तब्बल ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी अखेर सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. पूर्व-पश्चिम रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत मोलाच्या अशा या रस्त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा विचार बेस्ट प्रशासन करत आहे. हा मार्ग पूर्व मुक्तमार्गाएवढा लांब नसल्याने या मार्गावर जास्तीत जास्त सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे ‘बेस्ट’मधील सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात तीन तर हळूहळू आणखी २० बसमार्ग या रस्त्यावरून सुरू करण्याचा ‘बेस्ट’चा मानस आहे.
सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यामुळे पूर्व व पश्चिम या दोन्ही द्रुतगती महामार्गामधील अंतर खूपच कमी झाले आहे. सांताक्रूझ आणि चेंबूर या दोन उपनगरांना जोडणारे ‘बेस्ट’चे २० पेक्षा जास्त मार्ग सध्या खेरवाडी, कलानगर, शीव असा वळसा घालून येतात. दोन द्रुतगती महामार्गामधील अंतर कापण्यासाठी सध्या ‘बेस्ट’च्या बसगाडय़ांना एक ते दीड तासांपेक्षाही जास्त काळ लागतो. या नव्या मार्गामुळे हा वेळ २०-२५ मिनिटांवर येणार असल्याने या मार्गावर धावणाऱ्या बसच्या इंधनात चांगलीच बचत होईल. त्याचप्रमाणे प्रवासी संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या सांताक्रूझ ते चेंबूर या दरम्यान प्रामुख्याने ट्रॉम्बे ते यारी रोड (३५५ मर्या.), शास्त्री नगर सांताक्रूझ ते टाटा पॉवर स्टेशन चेंबूर (३५६ मर्या.) आणि अणुशक्ती नगर ते गोरेगाव आगार पश्चिम (३७४) हे तीन मार्ग चालतात. हे तीन मार्ग पहिल्या टप्प्यात नव्या रस्त्यावरून चालू करण्याचा विचार असल्याचे ‘बेस्ट’च्या सूत्रांनी सांगितले. मात्र कलानगर, शीव येथील प्रवाशांना या मार्गाचा वापर करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काही जादा मार्ग आखावेत का, असा विचारही सुरू आहे.
सांताक्रूझ ते मंत्रालय व्हाया फ्री वे?
बेस्टच्या प्रचलित मार्गाप्रमाणेच सांताक्रूझ ते मंत्रालय (सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता व पूर्व मुक्तमार्ग मार्गे) अशी काही बससेवा सुरू करता येईल का, याबाबतही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्याच्या मार्गाने हे अंतर कापण्यास अडीच तासांचा अवधी लागतो. मात्र या दोन नव्या मार्गाचा वापर केल्यास हे अंतर एक ते दीड तासांत कापणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे या नव्या मार्गाबाबत चाचपणी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय आणखी २० मार्ग या नव्या रस्त्यावरून चालवून ‘बेस्ट’चा परिवहन उपक्रम फायद्यात आणण्यास हातभार लागू शकतो, असाही विचार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा